नारायणगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा
नारायणगाव – जुन्नर बाजार समितीच्या निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त नारायणगाव येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार बेनके बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, बाजार समिती सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजणे, शरद लेंडे, गणपत फुलवडे, राजश्री बोरकर, रमेश भुजबळ, रमेश मेहेत्रे, विलास पाटे, जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ, अंकुश आमले, विनायक तांबे, बाजीराव ढोले, गणेश वाजगे, भाऊ देवाडे, देवराम लांडे, बाळासाहेब बढे, सुरेखा वेठेकर, जयप्रकाश डुंबरे, अर्चना ढोबळे, सुरज वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार बेनके म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी असली तरी तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी केली आहे. पक्षशिस्त व पक्षहितास कोणी बाधा आणल्यास कडक कारवाई करण्यात येईल. यापुढे पक्षाच्या बैठका नियमित घेतल्या जाणार असून बूथ कमिटीच्या अध्यक्षांनी सुचवलेल्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
कुकडी प्रकल्पाच्या फेरनियोजनात जुन्नर तालुक्यातील नद्यांवरील 68 कोल्हापूर बंधारे वगळण्यात आले असून शेतकऱ्यांचे नुकसान करणारे फेरनियोजन आम्हाला मान्य नाही. कुकडी प्रकल्पाच्या पाण्याबाबत विरोधकांनी खालच्या पातळीवर राजकारण केले आहे, असे आमदार अतुल बेनके यांनी यावेळी नमूद केले.
जुन्नर तालुक्यात ग्रामपंचायत, सोसायटी मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संघटन मजबूत असले तरी बाजार समितीच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याने मी समाधानी नाही. याबाबत आत्मपरीक्षण केले आहे.
– संजय काळे, सभापती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती