Nashik Lok Sabha Election 2024 – नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. एकीकडे हेमंत गोडसे (Hemant Godse) तर दुसरीकडे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाशिक लोकसभेसाठी आग्रही आहेत.
नाशिकची देणार असला तर साताऱ्याची जागा भाजपला सोडू अशी भूमिका अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, या जागेवर सध्या शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत. गेल्या दोन टर्ममध्ये या मतदारसंघातून हेमंत गोडसे विजयी झालेले आहेत. मात्र, या जागेवर उमेदवारी मिळत नसल्याने हेमंत गोडसे सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत.
आज देखील ते मुंबईला रवाना झाले आहेत. दुसरीकडे अजित पवारांनी देखील या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अजून कायम असल्याचे चित्र आहे.