लखनौ – समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव उमेदवार म्हणून प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते उत्तरप्रदेशच्या करहल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
उत्तरप्रदेशात यावेळी भाजप आणि सपमध्ये अटीतटीचा मुकाबला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर, सपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि पक्षाला अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी स्वत: अखिलेश यांनी उमेदवार बनण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी निवडलेला मतदारसंघ सपचा बालेकिल्ला असणाऱ्या मैनपुरी जिल्ह्यात येतो. अखिलेश यांचे वडील आणि सपचे संस्थापक मुलायमसिंह यादव लोकसभेत मैनपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्याशिवाय, मागील विधानसभा निवडणुकीत सपने करहलमधून मोठा विजय मिळवला. त्या पक्षाच्या उमेदवाराला लाखभरापेक्षा अधिक मतं मिळाली.
भाजप उमेदवाराला पराभूत करत सपच्या उमेदवाराने 38 हजारांचे मताधिक्य मिळवले. त्यामुळे सुरक्षित मतदारसंघ म्हणून अखिलेश यांनी करहलची निवड केल्याचे समजते. ते सध्या खासदार म्हणून आझमगढ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अखिलेश यांनी 2012 ते 2017 या कालावधीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रिपद भुषवले. त्यावेळी ते विधानपरिषदेचे सदस्य होते.