नवी दिल्ली – उत्तर प्रदेश सरकारने 4 जुलैपासून सुरू होणाऱ्या कावड यात्रेसाठी निश्चित केलेल्या मार्गांवर उघड्यावर मांसविक्री करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिका-यांची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी हा आदेश दिला.
आदित्यनाथ म्हणाले की, यंदा अधिकमास (अतिरिक्त महिना) असल्यामुळे श्रावण दोन महिन्यांचा आहे. या काळात श्रावणी शिवरात्री, नागपंचमी आणि रक्षाबंधन हे सण साजरे केले जातात. श्रावण महिन्यात 4 जुलैपासून पारंपारिक कावड यात्रा निघणार आहे. त्याआधी 29 जूनला बकरी ईद साजरी केली जाणार आहे.कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा काळ संवेदनशील आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
भाविकांच्या श्रद्धेचा मान राखून कावड मार्गावर उघड्यावर मांसविक्री होऊ देऊ नये. मार्ग स्वच्छ व सुंदर असावा. पथदिव्यांची व्यवस्था असावी. हवामान उष्ण असल्याने पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करावी. अशा सुचना आदित्यनाथ यांनी केल्या.
कावड मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या डीजे, संगीत इत्यादींची आवाज पातळी विहित मानकांनुसार असल्याची खात्री करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांसोबत विविध बाबींवर चर्चा केली.