मोबाईलवर PUBG गेम खेळत असताना प्रेमात पडल्यानंतर पाकिस्तानी महिला बेकायदेशीरपणे तिचा प्रियकर सचिनसोबत राहण्यासाठी भारतात आली. एकीकडे त्यांची लव्हस्टोरी भारतापासून पाकिस्तानपर्यंत चर्चेचा विषय बनली आहे, तर दुसरीकडे सीमा हैदरवरही पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सीमा हैदरची सत्यता जाणून घेण्यासाठी यूपी एटीएसच्या टीमने ग्रेटर नोएडा पोलिसांकडून सीमा आणि सचिनच्या स्टेटमेंटची प्रत घेतली आहे. सीमा हैदरच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आलेले तथ्य सचिन आणि सीमा यांची चौकशी करून पडताळले जाईल आणि त्यानंतर एटीएस त्याची नव्याने चौकशी करेल. यासाठी एटीएस सीमा हैदर, सचिन आणि त्याच्या वडिलांची नोएडा सेक्टर 94 च्या पोलीस कमांड रूममध्ये चौकशी करत आहे.
नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आल्यानंतर सीमा थेट ग्रेटर नोएडामधील तिच्या प्रियकराच्या गावात पोहोचली होती आणि तिथे शांतपणे त्याच्यासोबत राहत होती. मात्र, स्थानिकांना संशय आल्याने आणि पोलिस गावात पोहोचताच दोघेही तेथून पळून गेले. यानंतर यूपी पोलिसांनी हरियाणातील बल्लभगड येथून त्यांना पकडून न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला –
न्यायालयाने सीमा हैदर यांना सशर्त जामीन मंजूर केला. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याला कळवल्याशिवाय भारत सोडणार नाही, असा आदेश न्यायालयाने सीमा हैदरला दिला होता. एवढेच नाही तर न्यायालयाने सीमा यांना सध्याचा पत्ता बदलल्यास त्याबाबत न्यायालयाला कळवावे आणि बदललेल्या पत्त्याची माहितीही द्यावी, असे निर्देश दिले होते. न्यायालयाने तिसरी अट घातली होती की आता ती भारतात कोणताही गुन्हा करणार नाही.
गुप्तहेर असल्याच्या आरोपावर सीमा हैदर काय म्हणाली?
जामीन मिळाल्यानंतर सीमा हैदरची सर्वत्र चर्चा होऊ लागली. यानंतर सीमाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत, काहीजण तीला गुप्तहेर म्हणत आहेत तर काहीजण तीची संपूर्ण कहाणी बनावट असल्याचे सांगत आहेत. मात्र, सत्य काय आहे? हा तपासाचा विषय आहे. पण खुद्द सीमानेच यापूर्वी गुप्तहेर असल्याच्या आरोपांवर खुलासा केला होता.
‘इंडिया टुडे’शी बोलताना पाकिस्तानी सीमा हैदरने गुप्तहेर असण्याची कल्पना साफ नाकारली होती. ती म्हणाली- असं काही नाही. अखेर सत्य बाहेर येईल. हे खरे असते तर मी माझ्या निरागस मुलांसोबत नाही तर एकटीच भारतात आली असते.
आतापर्यंतच्या तपासात काय आढळले?
सीमा हैदरच्या प्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासात सीमा गुप्तहेर असल्याची शंका घेण्यासारखे काहीही भारतीय यंत्रणांना मिळालेले नाही. प्रेमात पडल्यानंतर सीमा पाकिस्तानच्या व्हिसाशिवाय भारतात आल्याचेही गुप्तचर यंत्रणांचे मत आहे.
लखनऊमध्ये, यूपीच्या एका उच्च पोलीस अधिकाऱ्यानेही ‘आज तक’ला सांगितले की ही हेरगिरीपेक्षा प्रेमाची बाब आहे. सीमाला भारतातच राहू द्यायचे की पाकिस्तानात परत पाठवायचे हे दिल्लीने ठरवायचे आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, सध्या सचिन आणि सीमा ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा भागात आहेत. 4 जुलै रोजी पोलिसांनी दोघांना अटक केली. सध्या तीची कोर्टातून जामिनावर सुटका झाली आहे.
सीमाने भारतात आल्यानंतर धर्म बदलला –
सीमा हैदरने भारतात आल्यानंतर सचिन आणि त्याच्या कुटुंबासाठी इस्लाम सोडला आणि हिंदू धर्म स्वीकारला. एवढेच नाही तर सीमाने मांसाहार सोडून शाकाहारी बनले. सीमा हैदरने धर्म बदलल्यानंतर सांगितले होते की, मला भारत आणि हिंदू धर्म खूप आवडतो. मात्र, सीमाने धर्म बदलून हिंदू झाल्यामुळे पाकिस्तानातील लोकांनी नाराजी व्यक्त केली. सीमा गुप्तहेर आहे का? तीला पाकिस्तानात परत पाठविले जाईल का? याबाबत एटीएसच्या तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.