शेवगाव – तालुक्याच्या पश्चिम भागात शुक्रवार सायंकाळी चारच्या सुमारास प्रचंड वादळ वाऱ्यासह ढगांच्या गडगडाट व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने थैमान घातले. तालुक्यातील तीन ठिकाणी नारळाच्या झाडांवरच वीज कोसळली असून, सुदैवाने कुठेही जीवित हानी झाली नाही.
तालुक्यात आज सायंकाळी अचानक प्रचंड पावसाने थैमान घातले.
भावी निमगाव येथील माधव गणपत चेडे यांच्या वस्तीजवळच शेताच्या बांधावरील नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने मोठा पेट घेतला. बराच वेळ नारळाच्या झाडामधून अग्निज्वाला बाहेर पडत होत्या. त्यातच जोराचा पाऊस आल्याने आग विझली. शहर टाकळीला दत्तवस्तीवर, तर भायगावच्या सावंत वस्तीवर या तिन्ही ठिकाणी योगायोगाने नारळाच्या झाडावरच वीज कोसळली असून, सुदैवाने कुठेही जीवित हानी झाली नाही.
परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, अनेकांचे काढणीस आलेला गहू व सोगून शेतात पडलेला गहू व कांदे, हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा पिकाचा मोहर व कैऱ्या वादळ वाऱ्याने झोडपून काढल्या.
शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठा चिंतातूर झाले आहेत. शेतकऱ्याला अद्याप मागील अनुदानच मिळाले नाही तोच पुन्हा त्याच्या नशिबी अस्मानी संकटाला तोंड देण्याची पाळी आली आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसाने नगर दक्षिण भागात चांगलाच धुमाकूळ घातला. नगर शहरासह पारनेर तालुक्यात काही भागात अवकाळी पाऊस झाला. पारनेर तालुक्यात काही भागात गारांचा पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.