किराणा, भाजीपाला दुकाने सकाळी 4 तास सुरू राहणार
ई- कॉमर्सची सेवाही सुरू होणार
पुणे – शहरातील लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारपासून अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत पुन्हा सुरू होणार आहेत. हे लॉकडाऊन 24 जुलैपर्यंत असेल. त्यानंतर ते वाढणार, की शहर पूर्वीप्रमाणेच सुरळीत होणार हे 23 जुलै रोजी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ई- कॉमर्स सुविधाही सोमवारपासून सुरू होणार आहे. पण, हॉटेलचे खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या स्विगी, झोमॅटोसह इतर सुविधा मात्र 24 जुलैपर्यंत बंदच असतील.
शहरात करोना बाधितांचे प्रमाण वाढल्याने दि.14 जुलैपासून शहरात पुन्हा दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यात पहिले पाच दिवस कडकडीत तर नंतरचे पाच दिवस अत्यावश्यक सेवा सुरू करण्यात येणार आहेत. लॉकडाऊनचा
दुसरा टप्पा रविवारपासून सुरू झाला. यात प्रशासानाने एक दिवसासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत पुणेकरांना खरेदीसाठी मोकळीक दिली. त्यानंतर, सोमवारपासून या वेळेत बदलही करण्यात आला आहे. त्यानुसार, आता अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहणार आहेत. नागरिकांना किराणा आणि भाजीसह, मांस, अंडी तसेच मासे याचा पुरवठा सुरळीत असणार आहे. त्यामुळे या अत्यावश्यक बाबी नियमित उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाच मुभा
लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतरही शहरात खासगी वाहतुकीस पूर्ण मनाई असणार आहे. तर, ज्या अत्यावश्यक सेवांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे त्यांनाही पोलिसांनी निश्चित करून दिलेल्या नियमांप्रमाणे वाहने वापरत येणार आहेत. तर पेट्रोल पंपावरही केवळ अत्यावश्यक सेवांमधील वाहनांनाच पेट्रोल देणे बंधनकारक आहे. सूट दिलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहने रस्त्यावर दिसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
या आस्थापना राहतील सुरू
– मेडिकल – पूर्ण दिवस
– दूध – पूर्ण दिवस
– किरणा दुकाने
– (किरकोळ व ठोक विक्री) सकाळी 8 ते दुपारी 12
– भाजीपाला – सकाळी 8 ते 12
– अंडी, मांस, मासे – सकाळी 8 ते 12
– पेट्रोल पंप सकाळी 8 ते सायंकाळी 6
– ई- कॉमर्स (घरपोच वस्तू पुरविणे) – पूर्ण दिवस