जुन्नर -जुन्नर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिनेश किसनराव दुबे (वय 57) यांचे रविवारी (दि. 19) पहाट पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील करोना बळींची संख्या सात झाली असून जुन्नर शहरातील हा दुसरा मृत्यू आहे.
एक आक्रमक नेता तसेच सर्वांसाठी संकटकाळात धावून जाणारा नेता अशी ओळख असलेले दिनेश दुबे हे भैया या नावाने सर्वांना परिचित होते. 30 पेक्षा अधिककाळ राजकारणात असलेल्या दुबे यांनी एकाही निवडणुकीत हार पत्करली नव्हती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष मर्जी असलेले तसेच आमदार अतुल बेनके यांचे जुन्नर शहरातील विश्वासू सहकारी असलेले दुबे हे पालिकेतील राष्ट्रवादीचे विद्यमान गटनेते होते.
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधीची निवडणूक जिंकली होती. त्यांचे चुलते सुरेश दुबे हे पालिकेत नगरसेवक असताना त्यांना राजकारणाचे धडे मिळाले. त्यानंतर तत्कालीन आमदार वल्लभ बेनके यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नगरपालिकेत 1996 ला प्रवेश केला. 1996 ते 2001 आणि 2001 ते 2006 या दोन टर्ममध्ये त्यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम पाहिले.
त्यानंतर 2006, 2011 आणि 2016 या सलग तीन निवडणुकीत जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून पालिकेत पाठविले होते. या कार्यकाळात त्यांनी नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्षपद भूषवत जुन्नर शहरात अनेक विकासकामे राबविली. त्यांच्या निधनामुळे शहरातील विविध स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.