पिंपरी -गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, स्मार्ट सिटी कौन्सिल इंडियाच्या वतीने आयोजित 7 व्या स्मार्ट शहरीकरण 2022 प्रदर्शनात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीला स्मार्ट एनर्जी, नागरी सहभाग आणि मोस्ट पॉप्युलर लीडरशिप या तीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सहारा स्टार, मुंबई येथे स्मार्ट सिटी कौन्सिल इंडियाचे संस्थापक व कार्यकारी संचालक प्रताप पडोडे, महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, एलव्हीएक्स ग्लोबलचे संस्थापक अध्यक्ष कोरी ग्रे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, कंपनी सचिव चित्रा पवार यांनी पुरस्कारांचा स्विकार केला.
स्मार्ट सिटी कौन्सिल इंडियाला 7 वर्ष पूर्ण झाल्याने वॉशिंग्टन डीसी आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सहकार्याने 7 व्या स्मार्ट शहरीकरण 2022 भारताच्या स्मार्ट शहरांच्या प्रवासासाठी आव्हाने आणि उपाय शोधणे व व्यापार वाढीसाठी सरकारी, खाजगी क्षेत्र आणि व्यावसायिक यांची एकत्रित चर्चा होण्याकरीता या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. लोकप्रिय लीडरशिप अवॉर्ड या क्षेणीत तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांना स्मार्ट आणि सक्सेसफुल एसपीव्ही सीईओ ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या स्मार्ट सारथी सिटीझन इंगेजमेंट या प्रकल्पाला स्मार्ट आणि यशस्वी नागरिक सहभाग पुरस्कार प्राप्त झाला. स्मार्ट एनर्जी या क्षेणीत स्मार्ट सोलर एनर्जी या प्रकल्पाला शाश्वत स्मार्ट एनर्जी सोल्यूशन्स डिझाइन आणि अंमलात आणण्याच्या प्रभावी पद्धतीला प्रोत्साहन दिल्याबददल पुरस्कार मिळाला.