पिंपरी, दि. 30 (प्रतिनिधी) – भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या भोसरीतील निवासस्थानी भेट दिली. लांडगे यांच्या मातोश्रींचे निधन झाले असल्याने गडकरी यांनी लांडगे कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, आमदार लक्ष्मण जगताप यांची ही भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
पुण्यातील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासह रस्ते विकासकामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आज पुणे दौरा केला. पुण्यातील चांदणी चौकातील मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल पाडण्यासाठी प्रशासकीय स्तरावरील तयारीचा त्यांनी आढावा घेतला. पूल पाडल्यानंतर वाकड, रावेत, औंध आणि बाणेर भागातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीची कितपत समस्या निर्माण होईल, याची देखील त्यांनी पाहणी केली. वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाय शोधण्यासाठी त्यांनी काय करता येईल, यासंदर्भात देखील स्थानिक अधिका-यांसोबत चर्चा केली. तसेच, वडगाव उड्डाणपूल, मुठा नदीवरील पूल, वाकड जंक्शन, भूमकर चौक, रावेत चौक या भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशही दिले.
आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री यांचे नुकतेच निधन झाल्याचे समजल्यानंतर गडकरी यांनी लांडगे यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले. तसेच, आमदार जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, निवडणूक प्रमुख शंकर जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी, उपाध्यक्ष भाजपा शेखर चिंचवडे, माजी नगरसेविका उषा मुंढे, निर्मला कुटे, माधवी राजापुरे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ चिंचवडे, राज तापकीर उपस्थित होते.