नेवासा – अनेक संघ स्वयंसेवकांच्या निःस्वार्थी सेवेतून भारत उभा राहत आहे. त्यांच्या निःस्वार्थी बलिदानातूनच आजचे दिवस दिसत असल्याने या ज्येष्ठ स्वयंसेवकांचा आशीर्वाद घेणे माझे भाग्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अन्न व प्रक्रिया मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केले.
नगर उत्तर लोकसभेच्या मतदारसंघातील दौऱ्यामध्ये गुरुवारी (दि. 29) पटेल यांनी तालुक्यातील देवगड व ज्ञानेश्वर मंदिर या दोन तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन समाधान मिळाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर डॉ. हेडगेवार पतसंस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा प्रभारी डॉ. राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, ओबीसी मोर्चाचे राज्य युवक संपर्कप्रमुख निरंजन डहाळे, भाऊसाहेब फुलारी, श्याम मापारी आदी उपस्थित होते.
आणीबाणीच्या काळामध्ये मिसा कायद्यांतर्गत तुरुंगवास भोगलेल्या संघ स्वयंसेवकांचा मंत्री पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता स्वयंसेवकांनी उभ्या केलेल्या कार्यातून आपल्या विचारांचे सरकार आले आहे. त्यामुळे राम मंदिर व काश्मीर प्रश्न सुटण्यास याच कामामुळे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पतसंस्थेचे सुरेश नळकांडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विलास गुजराती व मोहन खराडकर यांनी मनोगत व्यक्त केले. विश्वनाथ नाणेकर यांनी आभार मानले.