केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

मुंबई : राज्यासह देशभरात लाडक्‍या गणरायाचे आगमन झाले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साह दिसत आहे. तर गणरायाच्या दर्शनासाठी देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देखील आज मुंबईत दाखल झाले. हजारो मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपतीचे त्यांनी दर्शन घेतले.

सकाळी 11.30 च्या सुमारास ते सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. अमित शाह यांच्या उपस्थितीमुळे सिद्धिविनायक मंदिर परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. आजूबाजूच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली होती. तसेच, मंदिर परिसरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव काळात अमित शाह आवर्जून सिद्धिविनायक आणि लालबागच्या दर्शनाला येत असतात. दरम्यान, सकाळी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर दुपारी लालबागच्या राजाचे ते दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्‍चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणार आहेत. तर, दुपारी चारच्या सुमाराला ते नवी दिल्लीला रवाना होतील अशी माहिती आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×