उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
मुंबई : कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले माजी आमदार अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या. परंतु, या चर्चांना आज पुर्ण विराम मिळाला आहे. कारण अब्दुल सत्तार यांनी आज शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला.
सिल्लोड मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/l8EkzuROZy
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) September 2, 2019
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत कॉंग्रेसला रामराम केला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळात सत्तार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकांमुळे ते भाजपात जाणार असल्याचे बोलले जात होते. महाजनादेश यात्रेच्या रथावरही मुख्यमंत्र्यांसोबत सत्तार दिसले होते. त्यामुळे ते भाजपात जाणार हे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात असताना सत्तार यांनी शिवसेनेत दाखल होत सर्वांना धक्का दिला. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही. त्यांनी विचार करून हा निर्णय घेतला असून, शिवसैनिक म्हणून ते मराठवाड्यात काम करणार आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तर गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पीकविमा, कर्जमाफी संबंधी प्रश्नांवर शिवसेना महाराष्ट्रात काम करीत आहे. मी कॉंग्रेसमध्ये असताना विरोधी पक्ष म्हणून ती आमची जबाबदारी होती. पण ती जबाबदारी सत्तेत असतानाही शिवसेनेने पार पाडली. त्यामुळेच शिवसेनेत प्रवेश करत आहे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.