एकपक्षीय राजवट ही संसदीय लोकशाहीला मारक

संजय राऊत : पक्ष बदलणाऱ्या लोकांवर बारीक लक्ष ठेवावे
मुंबई, दि. 15 – देशात लोकशाही आणि स्वतंत्र्य टिकवायचे असेल तर विरोधी पक्षांचे महत्त्व कमी करून चालणार नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचे महत्त्व कमी झाले तर राजकर्ता हा बेफामपणे वागतो. एकपक्षीय राजवट ही संसदीय राज्यघटनेला मारक आहे, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्‍त केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत म्हणाले, राजकारणात वैचारिक निष्ठेचा स्तर सांभाळावा लागतो. भौतिक गोष्टींसाठी आणि ईडी, सीबीआय चौकशीसाठी पक्ष बदलणाऱ्या लोकांवर बारीक लक्ष ठेवावे लागत, असेही ते म्हणाले.

24 तासांत 24 मिनिटांत मत परिवर्तन, मन परिवर्तन होणे, पक्ष बदलणे यावर संशोधन झाले पाहिजे. सध्याचे राजकारण हे कपडे बदलण्याइतके सोपे झाले आहे. मात्र, आमच्याकडे माणसं पारखून घेतली जात असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

राजकारणामध्ये पक्षांतर इतके सोपे झाले आहे की, आता जनतादेखील त्यांची मज्जा बघत आहे. यामुळे लोकं गोंधळात पडले आहेत. कार्यकर्ते कोणता झेंडा घेऊ हाती, असे विचारत असल्याचेही ते म्हणाले.

युतीबाबत ते म्हणाले की, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे ठरवलंय अगदी तसंच होईल. यापेक्षा वेगळे काही होणार नाही. 288 जागेची तयारी म्हणजे प्रत्येक पक्ष हा महाराष्ट्राचा विचार करतो आणि निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष विस्तारासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे काम प्रत्येक पक्ष करतोय, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.