फ्रान्समध्ये पिवळ्या डगलेवाल्यांचे पुन्हा आंदोलन

पॅरिस: फ्रान्समध्ये काही महिन्यांपूर्वी पसरलेले पिवळ्या डगलेवाल्यांचे आंदोलन पुन्हा सुरू झाले आहे. आज पश्‍चिम फ्रान्समधील नॅन्टस या शहरामध्ये या पिवळे डगलेवाल्यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात उग्र आंदोलन करायला सुरुवात केली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केल्यावर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

इंधनाच्या भडकलेल्या किमतींच्या निषेधार्थ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये संपूर्ण फ्रान्सभर आंदोलनाचे लोण पसरले होते. हजारो विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या सर्वांनी प्रतीकात्मक पिवळे डगले घातल्यामुळे या आंदोलनाला “यलो व्हेस्ट मुव्हमेंट’ असे नाव पडले होते.

या देशव्यापी आंदोलनामुळे फ्रान्स सरकारने इंधनावर कर वाढण्याची योजना मागे घेतली होती. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांनी आर्थिक आपत्कालिक उपाययोजना म्हणून देशातील नोकरदार कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात 100 युरो इतकी वाढ केली. हे आंदोलन सलग 21 आठवडे सुरू होते. आता मॅक्रों यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून व्हायला लागली आहे.

पिवळे डगलेवाल्यांच्या आंदोलनात आतापर्यंत 11 जण ठार झाले तर 2 हजार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी किमान 8 हजारपेक्षा अधिक जणांना अटक केली आहे आणि 2 हजार जणांना कोठडीत पाठवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.