सांगली – सध्या पावसाळ्याचे दिवस असून अपघाताचा अधिक धोका असतो. अनेकदा दुचाकी घसरून अपघात होतात. सांगली जिल्ह्यात असाच अपघात झाला असून यामध्ये एका नवोदित अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अभिनेत्रीच्या लग्नाला महिना देखील पूर्ण झाला नव्हता.
दुचाकी घसरून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या भल्यामोठ्या दगडावर आदळल्यानं अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला आहे. पायल सागर बागडी असं अपघातात निधन झालेल्या 26 वर्षीय अभिनेत्रीचं नाव आहे. या अपघातात अभिनेत्रीचा पती आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेले दिग्दर्शक सागर राजाराम बागडी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मित्राच्या घरी एक दिवस थांबून पहाटे पुन्हा घराकडे परतत असताना हा अपघात घडला आहे. तीन आठवड्यांपूर्वी पायलचा विवाह झाला होता. मात्र अपघातात मृत्यूमुळे पायलचा संसार महिनाभरातच उद्धवस्त झाला आहे. या घटनेनं कुटुंबीयांत आणि मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पायल आणि सागर दोघंही चित्रपट सृष्टीचे संबंधित होते. यातूनच त्यांची ओळख झाली होती. काही दिवसांपूर्वी सागर बागडी यांनी सैर नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यामध्ये पायलनं मुख्य भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी दोघांनी नोंदणी पद्धतीनं विवाह केला होता. त्यानंतर 5 जुलै रोजी दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांनी त्याचा धार्मिक पद्धतीनं विवाह लावून दिला होता.
कुरळप पोलिसांनी या अपघाताची नोंद करून घेतली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.