विरोधकांचं नेतृत्व कोण करणार? प्रश्नावर ममता बॅनर्जी म्हणाल्या…

नवी दिल्ली – जगासह देशात गोंधळ उडवलेल्या पेगॅसस प्रकरणाबाबत आज काँग्रेस आणि समविचारी पक्षांची एक बैठक झाली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची ही बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधीही उपस्थित होते. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित नव्हत्या.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या राजधानी दिल्ली येथे असून त्यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. तत्पूर्वी मंगळवारी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची देखील भेट घेतली होती. मात्र आजच्या विरोधकांच्या बैठकीला त्या अनुपस्थित राहिल्याने याबाबत चर्चा सुरु होती.

याबाबत आता ममता बॅनर्जी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना बॅनर्जी यांनी, “सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र यायला हवं. आम्ही सर्व  एकत्र बसू व यातून मार्ग काढू.” असं बॅनर्जी यांनी सांगितलं.

यावेळी पत्रकारांनी त्यांना, विरोधी पक्षांचं नेतृत्व कोण करेल असा प्रश्न विचारला असता, “याबाबत सांगायला मी काही ज्योतिषी नाही. कोणीतरी पुढे येईल, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.” असं सांगितलं.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचे नाव पेगॅसस सॉफ्टवेअर वापरून फोन हॅक करण्यात येत असलेल्या नेत्यांच्या यादीत आले होते. ममता बॅनर्जी यांनी आपला फोन देखील हॅक करण्यात आल्याचा दावा केला होता. आज देखील बॅनर्जी यांनी आपला फोन हॅक करण्यात आला असून आपण कोणाशीही बोलू शकत नसल्याचं म्हंटलं.

“माझं नाव जरी पेगॅससच्या यादीत नसलं तरी, जर मी अभिषेक अथवा प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क साधला तर माझाही फोन हॅक होतो. एक फोन हॅक झाला की इतर फोन देखील आपोआप हॅक होतात.” असा आरोप त्यांनी लगावला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.