पुणे – शहरात गेल्या चार महिन्यांत अवघ्या 6 टक्के पुणेकरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात, वैद्यकीय कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्ससह सव्वा लाख ज्येष्ठ नागरिक असे केवळ 2 लाख 40 हजार जणांनाच आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.
तर, 6 लाख 94 हजार 992 जणांचा लसीचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ही स्थिती उद्भवली असून सरासरी विचार केल्यास एकूण लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेस महिन्याला केवळ दीड टक्के लोकांना दोन्ही डोस देणे शक्य झाल्याचे चित्र आहे. संसर्ग प्रमाण पाहता, ही मंदगती न परवडणारी आहे.
महापालिकेने दि.16 जानेवारी ते 14 मे या चार महिन्यांत सुमारे 9 लाख 35 हजार लसीचे डोस दिले आहेत. त्यात सर्वाधिक 45 ते 65 वर्षे आणि त्यापुढील सुमारे साडेपाच लाख नागरिकांचा पहिला डोस झालेला आहे. तर आरोग्य सेवक आणि फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण 100 टक्के पूर्ण झाले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली. त्यात पहिल्या टप्प्यात शासकीय तसेच खासगी हेल्थकेअर वर्कर्सला लस देण्यात आली. आतापर्यंत 58 हजार 991 जणांना पहिला डोस देण्यात आला. 45 हजार 677 जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.
तर, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कसचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्यात सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा तसेच करोना प्रतिबंधात्मक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यातील सुमारे 67,529 जणांना पहिला डोस देण्यात आला. 24 हजार 422 जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. तिसऱ्या टप्प्यात 1 मार्चपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते.
त्यानंतर शहरात आतापर्यंत 2 लाख 73 हजार 294 जणांना करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. या वयोगटातील 1 लाख 23 हजार 417 जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.
दि.1 एप्रिलपासून 45 ते 60 वर्षे वयोगटासाठी करोना लसीकरण सुरू झाले. त्यानंतर आतापर्यंत या वयोगटातील सुमारे 2 लाख 76 हजार 680 जणांना करोन लसीचा पहिला डोस देण्यात आला. या वयोगटातील 47 हजार 84 जणांचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे. दि. 1 मेपासून 18 वर्षांवरील प्रत्येकासाठी लस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्याने महापालिकेने या वयोगटाचेही लसीकरण सुरू केले. उपलब्ध होणाऱ्या लसींमधून दुसऱ्या डोसचे नियोजन करण्यासह, आतापर्यंत 18 वर्षांवरील सुमारे 18 हजार 508 जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात महापालिकेस यश आले आहे. हे सर्व पाहता शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अवघ्या 6 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे चित्र आहे.
महिन्याला फक्त दीड टक्के पुणेकरांचे लसीकरण
4 महिन्यांत अवघ्या
6 टक्के जणांनाच दोन्ही डोस
2 लाख 40 हजार 590 जणांचेच 2 डोस पूर्ण
6 लाख 94 हजार 992
जणांना पहिला डोस