– मेघश्री दळवी
अलीकडे मंगळावरून खूप आशादायक बातम्या येत आहेत. एकीकडे पर्सिव्हिअरन्स रोव्हर तिथले नवनवे फोटो आणि व्हिडिओ पाठवत आहे, तर दुसरीकडे इनजेन्युइटी हे हेलिकॉप्टर यशस्वी भराऱ्या मारत आहे.
सरासरी बावीस कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या या ग्रहावर आपण आपली यानं उतरवतो आणि जणू तिथे प्रत्यक्ष उभे आहोत असा अस्सल अनुभव घेतो, ही गोष्टच किती रोमांचक आहे. त्यात आता भर पडली आहे ती आणखी एका अनुभवाची. श्राव्य अनुभवाची.
इनजेन्युइटी हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचा व्हिडिओ पाठवताना पर्सिव्हिअरन्सच्या सुपरकॅमने त्याचा ऑडिओदेखील घेतला आहे. त्यातून हेलिकॉप्टरचा आवाज वेगळा करून, त्याची शक्ती वाढवून नासाने सर्वांसाठी खुला केला आहे.
हा आवाज तुम्हाला पर्सिव्हिअरन्सच्या ट्विटर अकाउंटवर ऐकता येईल. इनजेन्युइटी हेलिकॉप्टरची मंद घरघर निश्चितच सुखावणारी आहे. दृश्य अनुभवाला आणखीच खरीखुरी करणारी आहे.
त्याचबरोबर मनात प्रश्न उभा राहतो, की मंगळावरचा आवाज आपल्या पृथ्वीवरच्या आवाजाच्या तुलनेत वेगळा आहे का? आवाजाच्या लहरींना माध्यम जरुरी असतं. मंगळावर वातावरण खूप विरळ आहे. तिथे लहरींचा प्रवास कसा होत असेल? विरळ हवेचा आवाजावर काय परिणाम होत असेल?
तीही मोठी गमतीची गोष्ट आहे. मंगळावर आवाज थोडे अस्पष्ट ऐकू येतात, दबक्या आवाजात बोललेलं जसं वाटेल तसे. पार्श्वभूमीला वेगवेगळे आवाज ऐकायची आपल्याला पृथ्वीवर सवय आहे. पूर्ण शांततेत एखादा आवाज ऐकताना साहजिकच काहीतरी वेगळं वाटतं.
तसाच अनुभव मंगळावर येतो. या सगळ्यामागे पृथ्वीच्या जवळजवळ एक शतांश इतकं विरळ वातावरण, त्यातल्या घटकांचं पृथ्वीपेक्षा वेगळं प्रमाण आणि अगदी कमी तापमान या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आहे.
पृथ्वीवर ध्वनीचा वेग सेकंदाला सुमारे 340 मीटर इतका आहे. मंगळावरच्या थंड हवेत मात्र हा वेग सेकंदाला साधारण 240 मीटर इतका घसरतो. त्यामुळे बोललेलं ऐकायला येण्यातदेखील किंचित अंतर पडतं. सलग संभाषणात कदाचित हा फरक तितकासा जाणवणार नाही, पण एकच वाक्य बोललं तर मात्र समोरच्याला ते निश्चितच उशिरा ऐकू येईल.
त्याचप्रमाणे दूरच्या माणसाशी ओरडून बोलणे ही सवयदेखील मंगळावर सोडून द्यावी लागेल, कारण त्या व्यक्तीपर्यंत आवाज पोहोचेपर्यंत अत्यंत क्षीण होऊन गेलेला असेल.
सर्वात फरक पडेल तो उंच पट्टीतल्या आवाजाला. मंगळाच्या वातावरणात नव्वद टक्क्यांहून अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साइड आहे. हा वायू जास्त फ्रिक्वेन्सी असलेले ध्वनीतरंग शोषून घेतो.
त्यामुळे तिथे उंच पट्टीचे आवाज अजिबात ऐकायला येणार नाहीत. तेव्हा मंगळावरची शीळ चक्क फुकट जाईल! एक प्रयोग म्हणून पृथ्वीवरचे काही परिचित आवाज मंगळावर कसे ऐकू येतील याचे काही नमुने नासाने आपल्या वेबसाइटवर पेश केले आहेत. मंगळावरच्या आवाजाची अनोखी अनुभूती तिथे मनसोक्त घेता येईल.