बेरोजगारीची स्थिती अत्यंत गंभीरच

केवळ 13 टक्के कंपन्याच काही प्रमाणात करणार नोकर भरती

नवी दिल्ली – देशातील एकूण मंदीच्या स्थितीमुळे सुमारे 61 टक्के कंपन्यांनी निदान आगामी काही महिन्यात तरी आपली नोकर भरतीची तयारी नाही असे म्हटले आहे. येत्या तीन महिन्यात केवळ तेरा टक्के कंपन्यांनी काही प्रमाणात नोकर भरतीची तयारी दर्शवली आहे. मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आऊटलूक सर्व्हे मध्ये ही बाब समोर आली आहे. नव्याने नोकर भरती करणे शक्‍य आहे की नाही या विषयी 26 टक्के आस्थापनांनी काही भाष्य करण्याबाबत असर्मथता दर्शवली आहे.

गेल्या वर्षीच्या जुलेै ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या तुलनेत या वर्षी सुमारे चार टक्के नोकर कपात झाली आहे. ही सारी परिस्थिती पहाता भारतातील जॉब मार्केट मध्ये येत्या काही काळात सुधारणा होण्याची शक्‍यता अत्यंत अल्प आहे असे या सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहींत सेवा क्षेत्रातील काही सुधारणांमुळे नोकऱ्यांचे प्रमाण 16 टक्के वाढण्याची शक्‍यता यात वर्तवण्यात आली आहे.

याच अवधीत खाण आणि बांधकाम क्षेत्रात 11 टक्के आणि मॅन्युफॅक्‍चरिंग आणि रिटेल क्षेत्रात 11 टक्के नोकऱ्या वाढण्याची शक्‍यता आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले की दरवर्षी सुमारे दहा लाख पदवीधर भारतीय विद्यापीठांतून शिकून नोकऱ्यांसाठी बाहेर पडतात. त्यांच्या अपेक्षा या वातावरणात पुर्ण करणे शक्‍य नसल्याने सरकारने आता उद्योग क्षेत्राला ज्या कौशल्याचा कामगार लागतो त्याचे शिक्षण देणारी शिक्षण पद्धती भारत सरकारने सुरू करण्याची गरज आहे.

जगातील रोजगारीच्या स्थितीकडे पाहिले तर जपान, क्रोएशिया, तैवान, अमेरिका, ग्रीस आणि स्लोव्हेनिया या देशांत सर्वाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून हंगेरी, अर्जेंटीना, इटाली आणि स्पेन या देशांमध्ये रोजगाराच्या संधी आज कमी होताना दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.