ग्रामस्थांच्या सभेत दर कमी करण्याचा एकमताने निर्णय
नागठाणे – मटण दरवाढीविरुद्धच्या आंदोलनाचे लोण आता कोल्हापूर, साताऱ्यापाठोपाठ ग्रामीण भागातही पसरू लागले आहे. नागठाणे (ता. सातारा) येथे शुक्रवारी मटण दरवाढीविरोधात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. गावाने ठरवून दिलेल्या दरानेच 1 जानेवारीपासून मटण विक्री करावी अन्यथा व्यावसायिकांनी दुकाने बंद करावीत, असा एकमुखी निर्णय घेत अवाजवी दराने मटण-चिकन विकणाऱ्यांना “अल्टिमेटम’ देण्यात आला.
नागठाणे हे बाजारपेठेचे मोठे गाव आहे. येथील व्यावसायिकांनी केलेल्या दरवाढीचा परिणाम आजूबाजूच्या गावांमध्येही होतो. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात सध्या मटण व चिकनच्या दरवाढीमुळे लोकांमध्ये नाराजी आहे. कोल्हापूरमध्ये जनतेने केलेल्या आंदोलनाला यश आल्याने हे आंदोलन सातारा जिल्ह्यातही सुरू झाले आहे. त्याचे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे. नागठाणे येथे शुद्ध मटण 540 रुपये, मिश्र मटण 500 रुपये तर चिकन 180-200 रुपये किलो दराने विकले जाते.
या दरवाढीविरोधत शुक्रवारी सकाळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ विक्रेत्यांची बैठक झाली. प्युअर मटण 480रुपये, मिक्स मटण 450 रुपये व चिकन 150 रुपये किलो दराने विकावे, असे ग्रामस्थांनी सांगितले असता, उपस्थित व्यवसायिकांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे 1 जानेवारीपासून याच दराने मटण-चिकन विकावे. परवडत नसल्यास दुकाने बंद करा, असा निर्णय संतप्त ग्रामस्थांनी घेतला. बैठकीस सरपंच विष्णू साळुंखे, उपसरपंच सौ. मुक्ता राजे, ग्रामपंचायत सदस्य, विविध मंडळांचे कार्यकर्ते, मटण-चिकन विक्रेते उपस्थित होते.