पुणे – उदयोन्मुख खेळाडू जीत चंद्राने इंडियन ऑईल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 मध्ये मंगळवारी भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू हरमीत देसाईवर 2-1 असा विजय मिळवला. महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या इंडियन ऑईल अल्टिमेट टेबल टेनिसमध्ये बंगळुरू स्मॅशर्सने 9-6 अशा फरकाने गोवा चॅलेंजर्सवर विजयाची नोंद केली. पण, गोवा फ्रॅंचायझीने हा सामना गमावूनही एकूण 36 गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. बंगळुरू स्मॅशर्सला सीझन 4 मध्ये उर्वरित सामन्यांच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.
जीतने सकारात्मक सुरुवात करताना सुरतच्या हरमीतवर पहिल्या गेममध्ये 11-7 असा विजय मिळवला आणि दुसऱ्या गेममध्येही सातत्यपूर्ण खेळ करून बाजी मारली. भारतीय खेळाडूने अचूक खेळ आणि अप्रतिम फटके मारताना 11-7 अशाच फरकाने दुसरा गेम जिंकला. तिसऱ्या गेममध्ये हरमीतने कडवी टक्कर देताना गोल्डन गुणासह 11-10 असा विजय मिळवला. भारताच्या अव्वल मानांकित मनिका बात्राने 3-0 अशा फरकाने टी रीथ रिश्यावर विजय मिळवला.
रिश्याने मागील सामन्यात जागतिक क्रमवारीतील 28व्या क्रमांकावरील लिली झॅंगला पराभूत केले होते. मनिकाने आक्रमक खेळ करताना पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली. तिने पहिल्या सर्व्हिसपासून जबरदस्त खेळ केला आणि त्यामुळे हा गेम 11-4 असा जिंकला. मनिकाने दुसरा गेमही 11-5 असा जिंकला आणि तिसऱ्या गेममध्ये 11-7 अशी बाजी मारली. त्याआधीच्या सामन्यात बंगळुरू स्मॅशर्सच्या किरिल गेरासिमेन्कोने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेत्या अलव्हारो रोब्लेसवर 2-1 असा विजय मिळवला. रॉब्लेसने पहिला गेम 11-3 असा जिंकून सामन्यावर पकड घेतली होती, परंतु किरिलने जबरदस्त पुनरागमन करत दुसरा गेम 11-8 असा जिंकून सामना निर्णायक गेममध्ये नेला.
तिसऱ्या गेममध्ये किरिलने सर्वोत्तम खेळ करताना 11-5 अशा विजयासह सामनाही जिंकला. मिश्र दुहेरीत रॉब्लेस व रिथ यांनी 2-1 अशा फरकाने मनिका व किरिलचा पराभव करून गोवा चॅलेंजर्सचे आव्हान कायम ठेवले. बंगळुरू स्मॅशर्सच्या खेळाडूंनी पहिला गेम 11-7 असा जिंकला, परंतु रॉब्लेस व रिथ यांनी पुढील दोन्ही गेम 11-8 व 11-9 अशा फरकाने जिंकले. शेवटच्या सामन्यात गोवा चॅलेंजर्सच्या सुथासिनी सवेत्तबटने 2-1 अशा फरकाने नतालिया बायोरचा पराभव केला आणि फ्रॅंचायझीचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.
निकाल
गोवा चॅलेंजर्स 6-9 बंगळुरू स्मॅशर्स
अलव्हारो रॉब्लेस 1-2 गेरासिमेन्को (11-3, 8-11, 5-11)
रिथ तेनिसन 0-3 मनिका बात्रा (5-11, 5-11, 7-11)
अलव्हारो/रिथ 2-1 किरिल/मनिका (7-11, 11-8, 11-9)
हरमीत देसाई 1-2 जीत चंद्रा (7-11, 7-11, 11-10)
सुथासिनी सवेत्तबट 2-1 बायोर (7-11, 11-5, 11-7)