पुणे – गतविजेत्या चेन्नई लायन्सने इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत गतविजेत्यांनी पुणेरी पलटन टेबल टेनिस संघाचा 8-3 असा धुव्वा उडवला. चेन्नई लायन्ससमोर अंतिम सामन्यात रविवारी गोवा चॅलेंजर्सचे आव्हान असणार आहे.
भारताचा स्टार खेळाडू अचंता शरत कमल याला चौथ्या व निर्णायक सामन्यात मानुष शाहचा सामना करावा लागला. अचंताने उल्लेखनीय खेळ करताना संघासाठी महत्त्वाचा आठवा गुण मिळवला अन् फायनलमधील प्रवेश निश्चित केला. युवा खेळाडू मानुषने पहिला गेम 11-5 असा जिंकला, परंतु अचंताने चांगले पुनरागमन करताना दुसरा गेम 11-5 असा जिंकला आणि चेन्नई लायन्सला सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचवले.
त्याआधी, बेनेडिक्ट डुडाने पहिल्या सामन्यात 2018च्या आयटीटीएफ आफ्रिकन चषक विजेत्या ओमार अस्सारवर 3-0 असा विजय मिळवून चेन्नई लायन्सला दमदार सुरूवात मिळवून दिली. जागतिक क्रमावारीत 22व्या स्थानावर असलेल्या डुडाने पहिल्या गेमपासून आक्रमक खेळ करताना झोळीत गुण जमा केले. त्याने पहिला गेम 11-5 असा सहज जिंकला, परंतु दुसऱ्या गेममध्ये अस्सारकडून थोडी टक्कर मिळाली.
मात्र, डुडाने 11-7 अशी बाजी मारली, तिसऱ्या गेममध्ये डुडाने आक्रमकता कायम राखताना 11-6 असा विजय मिळवला. यांग्झी लियूने 2-1 अशा फरकाने हाना माटेलोव्हाचा पराभव करून सीझन 4 मधील अपराजित मालिका कायम राखली आणि गतविजेत्यांची आघाडी मजबूत केली. ऑस्ट्रेलियन खेळाडूला पहिल्या गेममध्ये हानाविरुद्ध संघर्ष करावा लागला. हानाने पहिला गेम 11-3 असा जिंकला, परंतु लियूने जबरदस्त पुनरागमन करताना पुढील गेम 11-8 असा जिंकून सामना निर्णायक वळणावर आणला. त्यातही लियूने 11-7 अशी बाजी मारली.
तिसऱ्या लढतीत शरत कमल व यांग्झी लियू यांनी 2-1 अशा फरकाने मानुष शाह व हाना यांचा पराभव करून चेन्नई लायन्सला 7-2 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. शरत/यांग्झी या जोडीने सकारात्मक खेळ करताना सामन्यावर पकड मिळवली आणि पहिला गेम 11-4 असा जिंकला. मानुष व हाना यांनी दुसऱ्या गेममध्ये 11-9 असे पुनरागमन केले. निर्णायक गेममध्ये चेन्नई लायन्सच्या जोडीने 11-6 असा विजय मिळवला.
निकाल
चेन्नई लायन्स 8-3 पुणेरी पलटन
बेनेडिक्ट डुडा 3-0 ओमार अस्सार (11-5, 11-7, 11-6)
यांग्झी लियू 2-1 हाना माटेलोव्हा (3-11, 11-8, 11-7)
शरत/यांग्झी 2-1 मानुष/हाना (11-4, 9-11, 11-6)
शरत कमल 1-1 मानुष शाह (5-11, 11-5)