पिंपरी – पुणे परिमंडल अंतर्गत अस्तित्वात असलेल्या यंत्रणेमधून वीजभाराच्या मागणीसह वीजजोडणी देणे शक्य आहे, अशा ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून फर्म कोटेशनच्या रकमेचा भरणा केल्यास तेथील ग्राहकांकडे महावितरणकडून शहरी भागात अवघ्या 24 तर ग्रामीण भागात 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येणार आहे.
नवीन वीजजोडण्या देण्यास महावितरणने मोठा वेग दिला असून पुणे परिमंडलामध्ये गेल्या एप्रिल ते जूनपर्यंतच्या केवळ तीन महिन्यांत 60 हजार 970 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांचा समावेश आहे.
या सर्व भागात अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेमधून ग्राहकांच्या मागणीनुसार वीजभारासह नवीन वीजजोडणी देणे शक्य असल्यास शहरी भागात 24 तासांत तर ग्रामीण भागात 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे. नवीन वीजजोडणीच्या अर्जासाठी महावितरणने www.mahadiscom.in ही वेबसाइट व मोबाइल ऍपद्वारे ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.