पुणे – भारताची स्टार खेळाडू मनिका बात्रा आणि नतालिया बायोर यांनी अविश्वसनीय कामगिरी करताना बंगळुरू स्मॅशर्सला 8-7 अशा फरकाने पुणेरी पलटन टेबल टेनिस संघावर विजय मिळवून दिला. महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 सुरू आहे. भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या मान्यतेखाली नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी लीगला प्रोत्साहन दिले आहे. 2017 पासून सुरू झालेली लीग भारतातील टेबल टेनिससाठी गेम चेंजर ठरली आहे.
पुणेरी पलटन टेबल टेनिस संघाला आज बाजी मारण्यासाठी केवळ एक गेम जिंकायचा होता; परंतु बंगळुरू स्मॅशर्सच्या नतालियाने महिला एकेरीच्या लढतीत अर्चना कामतवर 3-0 असा रोमहर्षक विजय मिळवला. नतालियाने पहिला गेम 11-8 असा जिंकून संघाच्या आशा पल्लवीत केल्या. अचूक फटके अन् बॅकहॅंड व फोरहॅंडचा वेगवान खेळ याच्या जोरावर नतालियाने 11-8 अशाच फरकाने दुसरा गेम जिंकला. निर्णायक गेममध्ये अर्चनाकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली, परंतु पोलंडच्या खेळाडूने 11-9 अशी बाजी मारून बंगळुरू स्मॅशर्सच्या रोमहर्षक विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, भारतातील सर्वोत्तम क्रमांकावरील मनिकाने हा सामना 2-1 असा जिंकला. महिला एकेरीच्या सामन्यात स्मॅशर्सच्या खेळाडूचे वर्चस्व पाहायला मिळाले. जागतिक क्रमवारीत 35व्या स्थानावर असलेल्या मनिकाने पहिल्या गेममध्ये पूर्णपणे पकड घेतली अन् 11-9 अशी बाजी मारली, परंतु हानाने दुसऱ्या गेममध्ये चांगले पुनरागमन केले व 11-8 अशा विजयाने सामना 1-1 असा बरोबरीत आणला. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये मनिकाने लक्ष विचलित होऊ न देता 11-6 असा विजय मिळवला.
त्याआधी, जागतिक क्रमवारीत 58व्या क्रमांकावर असलेल्या किरिल गेरासिमेन्कोने 2018च्या आयटीटीएफ आफ्रिकन-कप विजेत्या ओमार अस्सारवर 2-1 असा विजय मिळवून बंगळुरू स्मॅशर्सला दणदणीत सुरुवात करून दिली होती. जागतिक क्रमवारीत 23व्या क्रमांकावर असलेल्या ओमारने पहिल्या गेममध्ये आक्रमक खेळ करताना 11-8 अशी बाजी मारली, पण किरिल हार मानणाऱ्यातला नव्हता अन् त्याने पुढील दोन्ही गेममध्ये वर्चस्वपूर्ण खेळ केला. त्याने दुसरा गेम गोल्डन गुण घेताना 11-10 असा जिंकला. तिसरा गेमही गोल्डन गुणापर्यंत रंगला अन् किरिलने वर्चस्व गाजवले.
मिश्र दुहेरीच्या सामन्यात हाना आणि मानुष शाह यांनी मनिका व किरिल यांचा 3-0 असा पराभव करून पुणेरी पलटन टेबल टेनिस संघाला सामन्यात कमबॅक करून दिले. बंगळुरू स्मॅशर्सच्या जोडीने सुरुवात चांगली केली होती; परंतु हाना व मानुष यांनी जबरदस्त खेळ करत पहिला गेम 11-9 असा जिंकला. दुसरा गेम गोल्डन गुणापर्यंत रंगला आणि पुणेरी पलटनच्या जोडीने बाजी मारली. तिसरा गेम जिंकण्यात हाना व मानुष यांना फार कष्ट घ्यावे लागले नाही आणि त्यांनी 11-4 असा विजय मिळवला.
त्यानंतर पुरुष एकेरीत मानुषने 2-1 असा जीत चंद्रावर विजय मिळवून पुणेरी पलटन टेबल टेनिस संघाची आघाडी वाढवली. मानुषने पहिल्या गेममध्ये आत्मविश्वासाने खेळ करताना 11-9 अशी बाजी मारली आणि दुसऱ्या गेममध्येही याच गुणांसह विजय मिळवला. जीतने तिसऱ्या गेममध्ये 11-7 असा विजय मिळवून बंगळुरू स्मॅशर्सच्या आशा जिवंत ठेवल्या.
निकाल
पुणेरी पलटन टीटी 7-8 बंगळुरू स्मॅशर्स
ओमार अस्सार 1-2 गेरासिमेन्को (11-8, 10-11, 10-11)
हाना माटेलोव्हा 1-2 मनिका बात्रा ( 9-11, 11-8, 6-11)
मानुष/हाना 3-0 किरिल/मनिका ( 11-9, 11-10, 11-4)
मानुष शाह 2-1 जीत चंद्रा ( 11-9, 11-9, 7-11)
अर्चना कामत 0-3 नतालिया बायोर ( 8-11, 8-11, 9-11)