भिगवण (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाच टीएमसी उजनी धरणातून पाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. हा निर्णय रद्द झाला ही गोष्ट अत्यंत इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्याच्या मनाला दुःख देणारी आहे. इंदापूर तालुक्यातील भीमेकाठच्या लोकांना प्रकल्पाने मोठे नुकसान सहन करावे लागले तर उर्वरीत तालुका जवळ धरणपात्र असूनही तहानलेला आहे अशा वेळी आम्ही तालुक्याच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करू आणि धरणासाठी तालुक्यातील लोकांनी केलेला त्याग वाया जावू देणार नाही असे प्रतिपादन भिगवण-शेटफळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य हनुमंत बंडगर यांनी केले.
सोलापूरच्या उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उजनीतून पाणी उचलून इंदापुरात नेण्यासाठी लाकडी-निंबोडी योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली होती.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नानेच हे पाणी वळवण्यात आल्याचं सांगितलं जात होत, त्याला सोलापूरकरांनी विरोध केला. या विरोधामुळे उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी उचलण्याचा निर्णय जयंत पाटील यांनी रद्द केल्यानंतर इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाले. भिगवण परिसरातील २२ गावांत शेतीच्या पाण्याचा विषय महत्त्वाचा मानला जात असून शेतकरी वर्ग या विषयावर अत्यंत संवेदनाशिल बनला आहे.
आज दि.21 मे रोजी भिगवण शेटफळगडे गटातील शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी भिगवण शेटफळ गटाचे पुणे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली मदनवाडी या ठिकाणी रस्ता रोको, मुंडन, जोडे मारो आणि घोषणाबाजी करत आंदोलन केले.
इंदापूर तालुक्यातील भिगवण शेटफळगडे गटातील शेतकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी मदनवाडी चौक भिगवण येथे भिगवण -बारामती व भिगवण -राशीन रस्ता रोको केला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ पाणी आमच्या हक्काचं !नाही कुणाच्या बापाचं, तसेच उजनी धारणग्रस्थाना पाणी मिळालेच पाहिजे , आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आशा नानाविध घोषणा देण्यात आल्या. तसेच विष्णुपंत देवकाते यांनी स्वतः मुंडन करून निषेध नोंदवला. यावेळी विविध मान्यवर यांनी आपली भाषणांमधून निषेध व्यक्त करण्यात आला .
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार सचिन बोगवत, आबासो देवकाते, पोंधवडीचे सरपंच लक्ष्मण पवार, तक्रारवाडीचे सरपंच सतिश वाघ, अजिंक्य माडगे, धनाजी थोरात, मदनवाडी सोसायटीचे चेअरमन विष्णुपंत देवकाते, सतीश शिंगाडे, शरद चितारे, राजेंद्र देवकाते, नितीन काळंगे, किरण पन्हाळे, विजयकुमार गायकवाड, रोहित हेळकर, सुरेश बिबे, सतीश बंडगर, नवनाथ सुतार, सचिन खडके आदी उपस्थित होते.