मुंबई – काल उशिरा रात्री निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्वाचा निर्णय दिला. ज्यानुसार मुंबईतील आगामी पोटनिवडणुकीमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह कोणत्याही गटाला वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला तसेच या पोटनिवडणुकीमध्ये कोणत्याही गटाला शिवसेना हे नाव वापरता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय येताच उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी पक्षाचे चिन्ह काय असेल याबाबत सूतोवाच केला आहे.
निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला. उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठकांचे आयोजन केल्याचे समोर आले. चिन्ह गोठवल्यानंतर दोन्हीही गट आता निवडणूक आयोगासमोर कोणत्या चिन्हासाठी मागणी करणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं असताना. मिलिंद नार्वेकर यांनी आगामी काळासाठी आपले चिन्ह काय असेल याबाबत ट्विट केले आहे.
मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात वाघाचा फोटो असून त्यावर कॅप्शन लिहिले आहे. “आमचे चिन्ह,श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे… ” यावरूनच आता निवडणूक आयोगासमोर उद्धव ठाकरे हे वाघाच्या चिन्हासाठी आग्रह धरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दोन्हीही गटाला उद्या म्हणजेच सोमवारी चिन्हासाठीचे ३ पर्याय निवडणूक आयोगासमोर सादर करायचे आहेत.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 8, 2022