मुंबई – सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल होणाऱ्या आमच्या पोलिसांचा अभिमान आहे. पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून त्यांच्यासाठी जे-जे करणे शक्य आहे ते सर्व करणारच आणि हे वचन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयात आयोजित हुतात्मा दालन उद्घाटन व कॉफी टेबल बुक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, शौर्याला वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. 26 नोव्हेंबर हा शौर्यदिन. या दिनी शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना वंदन व नतमस्तक.
अगदी नक्षलवादी अतिरेक्यांपासून ते भुरट्या चोरांपासून सर्वांना पकडणारा हा आमचा पोलीस एक महत्त्वाचा घटक आहे. तो सुदृढ राहिलाच पाहिजे, त्याला सुदृढ ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढे अतिरेकी महाराष्ट्र, मुंबईवर हल्ला काय पण मुंबईचे नाव पण घेऊ शकणार नाहीत, त्यांना धडकी भरेल असे आपण पोलीस दलाचे भक्कम सक्षमीकरण करू.
पोलीस दलाचे नाव जगात सर्वदूर – अनिल देशमुख
देशाचा कणा असलेल्या मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी जो हल्ला झाला तो मोठ्या हिंमतीने आपल्या पोलीस व जवानांनी परतवून लावला. नक्षलवादी, अतिरेकी, गुन्हेगार, समाजकंटक अशा वेगवेगळ्या समाजविघातक शक्तींशी सामना करुन आपले पोलीस कारवाई करत असतात.
सध्याच्या करोना काळात तर पोलीस चोवीस तास कार्यरत आहेत. करोना विरुद्धची लढाई अजून सुरू आहे. ही लढाई अनिश्चित काळ आहे. पण आपले पोलीस दल हिंमत हरलेले नाहीत. महाराष्ट्र पोलिसांचे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्यांचे कर्तव्यावरील कौशल्य, चाणक्षबुद्धी, शिस्त याचे सर्वत्र कौतुक होते.