बंगळूर – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी उद्या (शुक्रवार) राज्य मंत्रिमंडळ आणि सत्तारूढ भाजपच्या खासदारांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकमधील नेतृत्वबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
77 वर्षीय येडियुरप्पा यांचे वय ध्यानात घेऊन कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याच्या पर्यायावर भाजपचे केंद्रीय नेतृत्व विचार करत असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्याबाबत भाजपच्या गोटातूनच विसंगत दावे केले जात आहेत.
कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार बराच काळपासून रखडला आहे. त्या विस्तारासाठी येडियुरप्पा यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे येडियुरप्पा यांनी बोलावलेल्या बैठका उत्सुकता वाढवणाऱ्या ठरल्या आहेत.
कर्नाटकचे काही मंत्री दिल्लीत तळ ठोकून असताना येडियुरप्पा यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. मंत्रिमंडळाची बैठक सकाळी तर खासदारांची बैठक दुपारी होणार आहे.
मात्र, काही खासदारांना बैठकीचा विषयच माहीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्नाटकात काय घडणार याबाबतचा सस्पेन्स आणखीच वाढला आहे. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी तर भाजप कर्नाटकमधील मुख्यमंत्री बदलणार असल्याचा दावा केला आहे. ती माहिती दिल्लीतील सुत्रांकडून मिळाल्याचे म्हणत त्यांनी तर्क-वितर्कांना आणखी खतपाणी घातले आहे.