Uddhav Thackeray : भाजप सातत्याने हिंदुत्वाच्या नावाने बोलत असते. मात्र, यांच्याकडे आहे तरी काय? देशप्रेम सांगत असाल, तर आम्ही सर्व इतिहास काढू. भाजपचे बापजादे सुद्धा स्वातंत्र्यलढयात नव्हते, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच तुमच्याकडून शिकायच तरी काय? गद्दारी? भाजपने अनेकांना गद्दार केले. दोन पक्ष फोडून आलो सांगतात याची लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ( Uddhav Thackeray )
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी लोकसभा बुलढाणा लोकसभेचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी मेहकर आणि सिंदखेडराजामध्ये जनसंवाद यात्रा घेत भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. उद्धव ठाकरे म्हणाले, गोमांस असलेल्या त्या कत्तलखाने आणि कंपन्यांकडून निवडणूक रोखे घेऊन हिंदुत्व शिकवणार असाल, तर जनता तुम्हाला निवडणुकीत कापणार नाही, तर कोणाला कापणार?
ज्या शिवसेनेने तुम्हाला सत्तेची गादी दाखवली त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. भाजपवाले स्वातंत्र्य लढ्यात कधीच नव्हते. मग तुमच्याकडून आम्ही काय शिकायचं? गद्दारी का अशी विचारणा केली. ते म्हणाले की त्यांच्याकडे प्रचंड धनसंपत्ती आहे पण माझ्याकडे जनसंपत्ती आहे.
ज्या गद्दारांना शिवसैनिकांनी आमदार खासदार केले होते त्याच गद्दारांना आता माझा शिवसैनिक या मातीत गाडणार असल्याचे ते म्हणाले. ज्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांच्यावर तुम्ही खोट्या केसेस दाखल करता, फक्त थोडे दिवस थांबा, असा इशारा त्यांनी दिला.
करोना महामारीच्या काळात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाचे जगभरात कौतुक झाले. यामुळेच राज्यातील करोनाचा मृत्यूदर कमी राहिला होता. यासाठी आताही सांगतोय भाजपच्या भूलथापांच्या नादी लागू नका. हुकुमशाहीला आजच गाडून टाका. गद्दारीला मते देऊ नका, समोर हुकूमशाहीचे संकट आहे. ( Uddhav Thackeray )