सातारा – सातारा शहरातील रस्ते, खड्डे आणि स्वच्छतेच्या अनागोंदी कारभारावर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी कडक ताशेरे ओढले. खड्डे बुजवण्यासाठी तुम्हाला कोणाची परवानगी लागते, शहरातील कचऱ्याची व्यवस्था कोणी बघायची, या उदयनराजेंनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमारावर पालिका अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. शहापूर पाणी पुरवठा योजनेचे अद्ययावतीकरण, नवीन घंटागाडयांची झालेली खरेदी याची तपशीलवार माहिती उदयनराजे यांनी घेऊन शहरात तातडीने रस्त्यांचे पॅचिंग सुरू करण्याच्या सूचना दिल्या. दोन तास झालेल्या या बैठकीत पालिकेच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला.
उदयनराजे भोसले यांनी शनिवारी जलमंदिर या निवासस्थानी पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी सातारा पालिकेच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. खड्डे बुजविण्यासाठी तुम्हाला कोणाची परवानगी लागते का, असा प्रश्न करून “घंटागाड्या कचरा उचलतात का हे कोणी पाहयचे, नागरिकांच्या तक्रारी येईपर्यंत गप्प बसू नका, कामे करा,’ अशा खास कानपिचक्या उदयनराजे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना दिल्या. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत कामाचा आढावा व झाडाझडती अशी वेळ आल्याने विभाग प्रमुख व प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना आपली बाजू मांडताना सारवासारवी करावी लागली.
शहरातील खड्डे बुजविण्यासाठी तुम्हाला मुहूर्त लागतो का, कोणाची परवानगी लागते, असा प्रश्न उदयनराजे यांनी मुख्याधिकाऱ्यांना रोखून केल्याने बैठकीची सुरवातच झाडाझडतीने झाली. घंटागाड्या कचरा उचलत नाहीत, हे कोण पाहणार, असे त्यांनी विचारले. वॉर्ड एक ते 20 मधील रस्त्याच्या पॅचिंगच्या कामांसाठी 30 लाख रूपये मंजूर केले होते. त्यातील 20 लाख खर्च झाले असून दहा लाख शिल्लक असल्याने त्यातून पॅचिंगचे काम तातडीने हाती घेण्याची सूचना त्यांनी केली. तसेच पॅचिंगची कामे दर्जेदार करा, भले त्याचे बजेट वाढले तरी त्याची काळजी करू नका, अशा स्पष्ट सूचना उदयनराजे यांनी दिल्या.
पालिकेने नव्याने खरेदी केलेल्या घंडागाड्या येत्या दहा डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. स्वच्छतेचे काम खासगीकरणातून होणार आहे. शहापूर पाणी योजनेचे दोन पंप बंद पडले होते. त्यामुळे नवीन दोन पंपांची खरेदी करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी काम करावे, जो काम करेल तो प्रिय असेल. जो काम करणार नाही, त्याचे काय करायचे ते मी बघतो, असा सज्जड दमही त्यांनी भरला. दोन तास झालेल्या या बैठकीत पालिकेच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला. बैठकीतून बाहेर आल्यावर मुख्याधिकारी शंकर गोरे यांचा चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती.