नाईस (फ्रान्स) – फ्रान्सच्या दक्षिणेकडील भागात एक ट्रकमध्ये पाकिस्तानातील 30 हून अधिक प्रवासी लपलेले आढळले आहेत, असे सरकारी वकिलांनी शनिवारी सांगितले. या सर्व प्रवाशांसह ट्रकचालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. हा ट्रकचालकही पाकिस्तानीच असल्याचे समजते आहे.
गेल्या महिन्यात ब्रिटनमधील रेफ्रिजरेटेड ट्रकमध्ये 39 लोक मृतावस्थेमध्ये आढळले होते. हे सर्व लोक व्हिएतनामी नागरिक असल्याचे लक्षात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा युरोपकडे जाणाऱ्या बेकायदेशीर निर्वासितांच्या मार्गांवरील दक्षता वाढवण्यात येऊ लागली आहे.
शुक्रवारी इटालीच्या सीमेजवळील महामार्गावर नियमित तपासणी दरम्यान 31 पाकिस्तानी स्थलांतरितांचा गट सापडला, असे फ्रेंच सरकारी वकिलांनी सांगितले. यामध्ये तीन किशोरवयीन युवकांचा समावेश होता, त्यांना इमिग्रेशन प्रक्रियेनुसार इटालियन अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले. “आम्ही नेहमीच अशा प्रकारच्या घटनांमधील सूत्रधारांना शोधून काढतो, त्याचप्रमाणे आम्ही प्रयत्न करू,’ असे नाइसच्या दक्षिण-पूर्वेतील शहरातील तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.