सातारा – राजघराण्यातील एका विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने खा. उदयनराजे भोसले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी भेट घेतली. राज ठाकरे यांच्या “कृष्णकुंज’ या निवासस्थानी झालेल्या भेटीत उभय नेत्यांमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
उदयनराजे व राज ठाकरे यांच्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. या भेटीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी उदयनराजेंनी संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात कोणीही राजकारण आणू नये. इतर कोणाच्या आरक्षणावर गदा येऊ नये. इतर समाजातील लोकांना न्याय मिळाला, तसा मराठा समाजातील लोकांनादेखील मिळावा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जपायला हवा, अन्यथा देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असे उदयनराजे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या, दि. 28 रोजी एका बैठकीचे आयोजन केले आहे. त्या संदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचे ते म्हणाले. या भेटीत उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरे यांना राजमुद्रा भेट दिली. उदयनराजे यांनी प्रथमच “कृष्णकुंज’ला भेट दिली.
राज ठाकरे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचे स्वागत केले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटले होते.