सातारा (प्रतिनिधी) – सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात खा. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची नवी दिल्लीत मंगळवारी भेट घेतली. प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध बाबींवर सकारात्मक चर्चा करून, या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वाढीव जागा मिळाव्यात, त्यासाठी मान्यता मिळावी, अशी मागणी खा. उदयनराजे यांनी केली.
साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यावर्षी 485 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम आणि यावर्षीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे; पण मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या तपासणीत पात्र ठरल्यासच प्रवेश प्रक्रियेला परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या तपासणीकडे आहे.
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यासाठी खा. उदयनराजे भोसले नवी दिल्लीत आहेत. सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची सोमवारी भेट घेतली.
सातारच्या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आरोग्य मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रक्रियेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहभाग घ्यावा. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त जागांना परवानगी मिळावी, अशी मागणी उदयनराजेंनी डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली.