मुंबई – जोनेवारी मतहन्यासाठीच्या वाहन विक्रीची आकडेवारी कंपन्यानी जाहीर केली आहे. त्यानुसार बऱ्याच कंपन्याच्या विक्रीत वाढ झाली असल्याचे दिसून येते. आगामी काळाबाबत टायोटा, टाटा मोटर्स, मारुती कंपन्या अशावादी झाल्या आहेत.
टोयोटाने जानेवारी 2021 मध्ये 11,126 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) कंपनीने देशांतर्गत मार्केटमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या जानेवारी महिन्यात 92 टक्के अधिक विक्री केली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात कंपनीने 5,804 वाहनांची विक्री केली होती.
टीकेएम कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवीन सोनी यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, नवीन वर्ष आमच्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाने सुरू झाले आहे. आमच्या उत्पादनांची घाऊक विक्री उत्साह वाढवणारी आहे आणि बुकिंगच्या ऑर्डरमध्येही वाढ झाली आहे. कंपनीने यंदा नवीन फॉर्च्युनर आणि लीजेंडर सादर केली आहे. या दोन्ही मॉडेल्सना प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सादर करण्यात आलेल्या नवीन इनोव्हा क्रिस्टलाही प्रतिसाद मिळाला आहे.
देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी 2020 मध्ये 1 लाख 54 हजार 123 वाहनांची विक्री केली होती. त्यामध्ये यंदा 4.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मारुतीने यंदा जानेवारी महिन्यात 1 लाख 60 हजार 752 वाहनांची विक्री केली आहे. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत 0.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर निर्यातीत 29.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
टाटा कंपनीने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 45 हजार 252 युनिट्स वाहनांची विक्री केली होती. त्यामध्ये यंदा 28 टक्क्यांची वाढ झाली आहे. टाटाने यंदा जानेवारी महिन्यात 57 हजार 742 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. टाटाच्या कार्सची विक्री दुपटीने वाढली आहे. जानेवारीमध्ये टाटाच्या 26 हजार 978 कार्सची विक्री झाली आहे. मात्र टाटाच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 15 टक्क्यांची घट झाली आहे.
ह्युंदाय इंडियाने देशांतर्गत मार्केटमध्ये यंदा जानेवारी महिन्यात 52 हजार 5 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. तर 8 हजार 100 वाहनांची निर्यात केली आहे. म्हणजेच ह्युंदाय इंडियाने 60105 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. ह्युंदाय इंडियाच्या एकूण विक्रीत 15.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. ह्युंदाच्या देशांतर्गत विक्रीत 23.8 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर निर्यातीत मात्र 19 टक्क्यांची घट झाली आहे.
वॉल्वो आयशरची जानेवारीमध्ये एकूण विक्री 2.3 टक्क्यांनी वाढून 5 हजार 673 युनिट्स राहिली.
देशांतर्गत वाहन विक्रीतही 1.9 टक्क्यांनी वाढ होऊन 4 हजार 871 वाहनांची विक्री झाली. तर वॉल्वोच्या वाहनाच्या निर्यातमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे. महिंद्राच्या एकूण प्रवासी वाहनांची विक्री 4 टक्क्यांनी वाढून 20 हजार 634 मोटारींवर आली आहे. तर शेतीच्या उपकरणांची विक्रीदेखील वाढली आहे. शेतीच्या उपकरणांच्या विक्रीत 50 टक्क्यांची वाढ होऊन यंदा जानेवारीत महिंद्राने 34,778 उपकरणांची विक्री केली आहे.