उदयनराजेंचा आज भाजपमध्ये प्रवेश

रामराजे, धैर्यशील कदम, आनंदराव पाटील यांचे “वेट अँड वॉच’

सातारा –
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा शनिवारी दि.14 सप्टेंबर रोजी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय निश्‍चित झाला आहे. उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी दुपारी ट्‌विट करून माहिती दिली. दुसऱ्या बाजूला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांना या वयात सोडून जाऊ शकत नाही. मात्र, उद्या तरूण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निर्णय बदलू शकतो, असे सांगत तूर्त “वेट अँड वॉच’ एवढीच भूमिका घेतली. दरम्यान, कॉंग्रेसचे नेते आमदार आनंदराव पाटील व धैर्यशील कदम यांनीदेखील सावध भूमिका घेतली. तर माणमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जयकुमार गोरे यांना कडाडून विरोध दर्शविला.

शुक्रवारी जिल्ह्यात जोरदार राजकीय घडामोडी घडल्या. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे तर धैर्येशील कदम यांनी उंब्रज (ता. कराड) येथे, आमदार आनंदराव पाटील यांनी विजयनगर (ता. कराड) येथे आणि दहिवडी (ता. माण) येथे सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले. त्यामध्ये सर्वाधिक चर्चेचा व निर्णायक विषय ठरला तो म्हणजे खासदार उदयनराजे यांचा. ते शनिवारी भाजपमध्ये करणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. खुद्द उदयनराजे भोसले यांनी ट्विट करून शनिवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, ना. नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांच्या चर्चांना एकप्रकारे पूर्णविराम मिळाला.

त्यापाठोपाठ रामराजे नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. फलटण येथील मेळाव्यात व तसेच पत्रकारांशी संवाद साधताना रामराजेंनी शरद पवार यांना सोडायची आपली इच्छा नाही. मात्र, तरूण कार्यकर्त्यांचा आग्रह मोठा आहे. अशा वेळी दुष्काळी तालुक्‍यांची एकत्रित आघाडी करून निवडणूक लढविण्याची तयारी रामराजे यांनी दर्शविली. त्याचबरोबर आज राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात जाऊन मतदारसंघ नेमक्‍या कोणत्या पक्षाला सुटणार, असे अनेक प्रश्‍न आपल्यासमोर असल्याचे रामराजे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे माण- खटावधील भाजप, सेना, राष्ट्रवादी, रिपाइंच्या नेत्यांनी एकत्रित येत जयकुमार गोरेंच्या उमेदवारीला विरोध करत एकच उमेदवार देण्याची घोषणा केली.

दरम्यान, धैर्यशील कदम यांनी देखील उंब्रज येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. त्या कार्यक्रमास भाजपचे नेते उपस्थित राहिले. त्यांनी कदम यांना सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली मात्र, कदम यांनी योग्य वेळी निर्णय जाहीर करण्याचे संकेत दिले. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक आमदार आनंदराव पाटील यांनीदेखील विजयनगर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. त्यावेळी पक्षश्रेष्ठींकडून मिळत असलेली वर्तणुकीवरून त्यांनी खंत व्यक्त केली. मात्र, भाजपमध्ये जाण्याबाबत ठोस भूमिका जाहीर केली नाही. असे असले तरी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महाजनादेश यात्रेत काय घडामोडी घडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय महाजनादेश यात्रा दि.15 सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यात येणार आहे. यावेळी सैनिक स्कूल हायस्कूल, सातारा येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व कायकर्त्यांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन उदयनराजे मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.