‘मोरया…’चा अखंड गजर; गणपती बाप्पांना उत्साहपूर्ण वातावरणात निरोप

यंदा 2 तास 29 मिनिटे आधी संपली मिरवणूक


मनमोहक, सजलेल्या रथांनी फेडले डोळ्यांचे पारणे


पर्यावरण जपण्याच्या संदेशावर यंदाही भर


जागेवरच विसर्जन करत 137 मंडळांचा नवा पायंडा

पुणे – “गणपती बाप्पा मोरया…. मंगलमूर्ती मोरया’, “पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत लाडक्‍या गणरायांना गुरूवारी भावपूर्ण निरोप दिला. ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांचा गजर… पारंपरिक वेशभूषेतील गणेशभक्तांचा जनसागर… सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या… भव्य आरास… “डीजे’चा दणदणाटासह गणेशभक्तांच्या उत्साहाची साथ असे चित्र गुरूवारी शहरात पाहायला मिळाले. उल्हासित वातावरणात “बाप्पां’ची मिरवणूक दिमाखदार ठरली. “श्रीं’च्या मूर्तींची लोभसवाणी रूपे, सामाजिक जागृती करणारी पथके, साहसी खेळांचे सादरीकरण, आबाल वृद्धांसह परदेशी नागरिकांचा सहभाग, पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी रस्त्याने निघालेल्या भव्य मिरवणुका, मनमोहक देखाव्यांनी सजलेले रथ अशा डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या उत्सवाची गुरूवारी सांगता झाली.

मागील वर्षी विसर्जन मिरवणूक 26 तास 36 मिनिटे सुरू होती. त्या तुलनेत यंदा 2 तास 29 मिनिटे आधी मिरवणूक संपली. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मिरवणुकीची सांगता झाली. तर एक गणेश मंडळ विसर्जन घाटावर आरतीसाठी थांबून होते. या गणपतीचे विसर्जन नटेश्‍वर घाटावर दुपारी बाराच्या सुमारास पार पडले. यावर्षी मिरवणूक तब्बल 24 तास 7 मिनिटे सुरू होती. यंदा दोन हजार 484 सार्वजनिक, 1 लाख 75 हजार 424 घरगुती आणि 137 गणेश मंडळांनी जागेवर गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिल्या कसबा गणपतीची आरती महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाली. यानंतर मुख्य मिरवणुकीला “गणपती बाप्पा मोरया’ आणि वाद्यांच्या गजरात सुरूवात झाली. मानाच्या सर्व गणपतींची सार्वजनिक मिरवणूक यंदा सकाळी सव्वादहाच्या सुमारास सुरू होऊन सायंकाळी साडेसहा वाजता समाप्त झाली. ही मिरवणूक तब्बल आठ तास सुरू होती. या विसर्जन मिरवणुकीत झालेल्या पारंपरिक वादनावर उपस्थितांनी ठेका धरला. यासह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची गणपतींची मिरवणूक रात्री 12 नंतर सुरू झाली. तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळाच्या गणपतींची मिरवणूक सकाळी सातच्या सुमारास आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणपतीची मिरवणूक सकाळी आठ वाजता समाप्त झाली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुपारी 3 वाजता टिळक चौकात असलेल्या महापालिकेच्या मंडपात उपस्थिती नोंदवली. पाटील यांच्या हस्ते मानाचे श्रीफळ देऊन कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांचा सत्कार करण्यात आला आणि गणेशाचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यानंतर नटेश्‍वर घाटावर पाटील यांच्याच हस्ते आरती होऊन कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

ध्वनी प्रदूषणांतर्गत 12 गुन्हे
मानाच्या गणपतींव्यतिरिक्त मिरवणुकीत यंदा “डीजे’, “डॉल्बी’चा दणदणाट ऐकायला मिळाला. टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोड या रस्त्यांवर “डीजे’ दणदणाट सुरू होता. डीजेच्या तालावर तरुणाईही बेधुंदपणे थिरकली. या मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणांतर्गत 12 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये 10 साऊंड सिस्टीम मिक्‍सर जप्त करण्यात आले. चार मुख्य मिरवणूक मार्गांपैकी लक्ष्मी रस्त्याने 290, टिळक रस्त्याने 196, कुमठेकर रस्त्याने 46, केळकर रस्त्याने 70 अशी एकूण 602 मंडळे टिळक चौकात दाखल होऊन विसर्जन घाटांकडे रवाना झाली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

मंडळांची संख्या वाढली
मागील वर्षी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता आणि केळकर रस्ता या मुख्य रस्त्यांवरून केवळ 301 मंडळांच्या मिरवणुका टिळक चौकाकडे मार्गस्थ झाल्या होत्या. मात्र, यंदा ही संख्या दुपटीने वाढली असून, ही संख्या तब्बल 602 वर पोहोचली होते. तर मागील वर्षी 24 गणेश मंडळांनी अनेकांपुढे आदर्श ठेवत जागेवरच विसर्जन केले होते. यंदा 137 मंडळांनी जागेवर विसर्जन केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.