टायपिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी
पुणे – शहरात टायपिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण पुण्यात मंगळवारपासून (दि. 6) टंकलेखन संस्था सुरू होणार आहेत. त्यामुळे टायपिंग इन्स्टिट्यूट चालकांना दिलासा मिळाला आहे.
पुणे जिल्हा शासनमान्य संगणक टंकलेखन, मॅन्युअल टंकलेखन व लघुलेखन संस्थांची पुणे जिल्हा संघटनेने करोना पार्श्वभूमीवर सुरक्षेचे सर्व नियम पाळून संस्था सुरू करण्याची परवानगी मागितली होती. राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अटी व शर्तींसह संस्था सुरू करण्याची परवानगी दिली आहे. शासकीय वाणिज्य संस्थांची तालुकानिहाय यादी संबंधित तहसीलदार कार्यालयाकडे सादर करावी लागणार आहे.
करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामाजिक अंतराचे निकषाचे पालन करणे आवश्यक आहे. प्रतिबंध क्षेत्रातील संस्था सुरू करण्यास परवानगी नसेल. प्रतिबंध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना जोपर्यंत त्यांचे क्षेत्र पूर्ववत सुरू होणार नाहीत, तोपर्यंत प्रवेश देण्यात येऊ नये. विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवहीत दररोज अद्ययावत करावी. जेणेकरून संशयित रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोयीचे ठरेल.
संस्था सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सोमवार ते शनिवार या दिवशी सुरू राहतील. प्रत्येक विद्यार्थ्याने संस्थेत प्रवेशावेळी सॅनिटायझरचा वापर करावा. प्रवेशापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्क्रिनिंग करणे अनिवार्य राहील. शक्यतो विद्यार्थ्यांने हॅण्डग्लोजचा वापर करावा. मास्क बंधनकारक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे आरोग्य कार्ड तयार करून त्याची नोंदी ठेवणे आवश्यक असल्याचे निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे संस्थाचालक पालन करतील. संस्थेची जागा व यंत्रे सॅनिटाइझचे कामकाज सुरू आहे. परवानगी मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.
– हेमंत ढमढेरे, महासचिव, महाराष्ट्र टंकलेखन संस्था