‘पुनरागमनाय’चे 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज

पुनीत बालन स्टुडिओजच्या जनहितार्थ निर्मितीला गणेशभक्‍तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे – करोनामुळे विविध उत्सव साजरे करण्यावर यंदा मर्यादा आल्या, आगामी नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठीसुद्धा प्रशासनाने नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. करोना संकटाचा सर्वाधिक परिणाम नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवावर झाला. पुण्याला सार्वजनिक गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा आहे. पुणेकरांनी या संकटकाळात प्रशासनाला सहकार्य करत, नियमांचे पालन करत गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला.

डॉक्‍टर, प्रशासन आणि पुणेकरांच्या संवेदनशीलतेला “पुनरागमनाय च’ या डॉक्‍युड्रामामधून युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या “पुनीत बालन स्टुडिओज’च्या वतीने सलाम करण्यात आला. या “डॉक्‍युड्रामा’ला पुण्यासह जगभरातील गणेशभक्‍तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, 8 दिवसांत “पुनरागमनाय च’ या डॉक्‍युड्रामाने 1 मिलियनहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार केला.

पुनरागमनाय च- गणेशोत्सव 2020 चे लेखक क्षितिज पटवर्धन आणि डिओपी- दिग्दर्शक महेश लिमये हे आहेत. या डॉक्‍युड्रामाच्या माध्यमातून आम्ही डॉक्‍टर्स, पोलीस, महापालिका प्रशासन आणि पुणेकरांना त्यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल मानवंदना दिली आहे. या उपक्रमाला पुण्यासह जगभरातील गणेशभक्‍तांनी दिलेला प्रतिसाद आम्हाला चांगल्या सामाजिक कार्यासाठी अधिकाधिक प्रेरणा देणारा आहे, असे निर्माते पुनीत बालन म्हणाले.

“पुनीत बालन स्टुडिओज’ची जनहितार्थ निर्मिती असलेल्या या डॉक्‍युड्रामाची संकल्पना बालन आणि लीड मीडियाचे विनोद सातव यांची आहे. या डॉक्‍युड्रामासाठी पुण्याचे पोलीस सहआयुक्‍त डॉ. रवींद्र शिसवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. हा डॉक्‍युड्रामा “पुनीत बालन स्टुडिओज’च्या युट्यूब चॅनल, फेसबुक, इनस्टाग्राम पेज आणि पुणे पोलिसांच्या सर्व सोशल मीडिया हॅंडल्सवर विनामूल्य पाहता येतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.