उरी (जम्मू-काश्मीर) – सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी (Uri) सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना (Pakistani terrorists) ठार केले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
किमान दोन दहशतवादीही जखमी झाले आहेत. खराब हवामानामुळे शोधकार्य सध्या थांबवण्यात आले आहे. श्रीनगर-स्थित संरक्षण प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना माहिती मिळाली होती की,
सशस्त्र दहशतवाद्यांचा एक गट नियंत्रण रेषेवरून जोरदार घुसखोरी करण्याची योजना आखत आहे. यानंतर, सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आणि घुसखोरीविरोधी ग्रिड मजबूत करण्यात आली.
संततधार पाऊस आणि खराब दृष्यमानतेचा फायदा घेत सशस्त्र दहशतवाद्यांच्या एका गटाने नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास सैनिक आणि दहशतवाद्यांच्या गटात चकमक झाली.
अंधार पडेपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता, परिणामी दोन दहशतवादी ठार झाले. वाचलेले दहशतवादी त्यांच्या साथीदारांचे मृतदेह घेऊन पसार झाले. या भागावर रात्रभर पाळत ठेवण्यात आली होती.
अंधारामुळे सुरक्षा दलांनी परिसराला कडेकोट बंदोबस्त लावला आणि शनिवारी रात्रभर जागरुकता ठेवली. रविवारी घटनास्थळाचा शोध घेण्यात आला.
तेथून दोन एके रायफल, सहा पिस्तूल, चार चिनी बनावटीचे ग्रेनेड, ब्लॅंकेट आणि दोन रक्ताने माखलेल्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी आणि भारतीय चलनी नोटा, पाकिस्तानी औषधे आणि खाद्यपदार्थही सापडले.