नागपूर – पूर्व महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यातील एक जण हा 2019 मध्ये जांभूळखेडा बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार होता.
नक्षलवाद्यांची एक तुकडी छत्तीसगड सीमेवर गोडलवाही चौकीजवळील बोधिंटोला जवळ तळ ठोकून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कोम्बिंग ऑपरेशन राबविले.
यादरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. जवळपास एक तास चाललेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. दरम्यान, या कारवाईत एक एके-47 रायफल आणि एक सेल्फ-लोडिंग रायफल (एसएलआर) देखील जप्त करण्यात आली आहे.