कोथरूड आणि हडपसर येथील घटना
गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक संपला?
पुणे – शहरात लॉकडाऊन शिथिल झाल्यावर गंभीर गुन्हे बोकाळले आहेत. यामध्ये खून आणि खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरात मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत खुनाच्या 14 आणि खुनाच्या प्रयत्नाच्या 19 घटना घडल्या होत्या. हे सत्र जून आणि जुलैमध्येही सुरूच आहेत. सोमवारी एकाच दिवशी कोथरुड आणि हडपसर येथे दोन खुनाच्या घटना घडल्या. या घटना भरदिवसा घडल्याने गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसल्याचे जाणवत आहे.
गॅरेज चालकाचा गांधी भवनाजवळ खून
एका गॅरेज चालकाचा डोक्यात वार करून खून करण्यात आला. ही घटना कोथरुड येथील गांधी भवन परिसरात सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. राकेश क्षीरसागर (23, रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांत अज्ञात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेशचे एका कॉम्प्लेक्समध्ये दुचाकीचे गॅरेज आहे. दुपारी अचानक काही व्यक्ती तेथे आल्या. वाद घातल्यानंतर त्यांनी त्याच्या डोक्यात कोयता व इतर लोखंडी हत्यारांनी वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने स्थानिक नागरिकांनी राकेशला रुग्णालयात नेले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आदी दाखल झाले होते. जुन्या वादातून ही घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखा व कोथरुड पोलिसांचे पथक रवाना झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पैशांसाठी चिकन शॉपचालकाने तरुणाचा घेतला जीव
रोकड लंपास करण्यासाठी चिकन शॉपचालकाने चिकन कंपनीच्या कर्मचाऱ्यावर सुरीने वार करत निर्घृण खून केला. ही घटना साडेसतरानळी येथील चिकन शॉपमध्ये सोमवारी घडली. हडपसर पोलिसांनी अवघ्या दीड तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आकाश लक्ष्मण भोसले (24, रा. उन्नती नगर, हडपसर, मूळ रा. निलंगा-लातूर) असे खून झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लहु शिंदेला ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा अमिर चिकन कंपनीकडे डेली कलेक्शनचे करत होता. आकाश लहूकडे सोमवारी पैसे घेण्यासाठी आला. त्यावेळी शिंदे याने चिकन कापण्याच्या चाकूने आकाशवर वार केले. त्यामध्ये आकाश गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आकाश रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर त्याच्याकडील रोकड असलेली बॅग आरोपीने दुकानातच लपवली आणि शटर अर्धवट बंद करुन पळ काढला. ही माहिती एका नागरिकाने पोलिसांना दिली. यावर पोलिसांनी परिसर पिंजून काढत लहू याला पळून जाताना ताब्यात घेतले. त्याने चौकशीत “दोन व्यक्ती आकाशच्या पाठोपाठ आल्या होत्या, त्यांनी खून केला’ असा बनाव केला. मात्र, पोलिसांपुढे हा बनाव टिकू शकला नाही.