पुणे – रुबी हॉल किडनी प्रत्यारोपण प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या एजंटांनीदेखील किडन्या दिल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पोलीस कोठडीत 21 मेपर्यंत वाढ झाली आहे. याबरोबरच या दोघांनी आणखी दोघांना किडनी मिळवून दिल्याचेही उघडकीस आले आहे. त्यांनी सहा वर्षांपूर्वी बदलापूर येथील एका डॉक्टरच्या वडिलांना आणि पंढरपूर येथील एकास किडनी मिळवून दिली आहे.
आरोपींनी मिळवून दिलेल्या किडनींचे ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल, आणि कोइमतूर येथील केएचसीएच हॉस्पिटलमध्ये प्रत्योरापण झाले आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी केली. दरम्यान, या गुन्ह्याची व्याप्ती वाढत आहे.
सविस्तर चौकशी करण्यासाठी आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. अभिजित शशिकांत गटणे (वय 40, रा. रजूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय 43 , रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) अशी या गुन्ह्यात अटक केलेल्या एजंटाची आहेत. रोडगे याने त्यावेळचा एजंट सावंत याच्या मदतीने त्याची किडनी कल्याणीनगर येथील एका मुलीला दिली. ती मुलगी त्याच्या घरातील नोकर असल्याचे त्याने दाखवले आहे. तर गटणे याने देखील 2012 मध्ये सावंत याच्यावितीने त्याची एक किडनी बंगलोर येथील एका व्यक्तीला दाखवले आहे. ते मामा असल्याचे त्याने कागदोपत्री दाखवले आहे.
आंतरराज्यीय टोळी?
या गुन्ह्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून यामध्ये आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढू शकते. गुन्ह्याच्या तपासामध्ये ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर आरोपींकडे तपास करण्यासाठी त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी केली.