कोलकता: पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी आणखी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. ते जमात-उल्-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेचे सदस्य आहेत. ताज्या कारवाईमुळे बंगालमध्ये केवळ नऊ दिवसांच्या कालावधीत जाळ्यात सापडलेल्या जेएमबीच्या सदस्यांची संख्या चार इतकी झाली आहे.
कोलकत्यात सोमवारी मोहम्मद अब्दुल काशेम या जेएमबीच्या सदस्याला अटक करण्यात आली. त्याने चौकशीवेळी दिलेल्या माहितीच्या आधारे कोलकता पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) आणखी दोघांना अटक केली. अब्दुल बारी आणि निजामुद्दीन खान अशी त्यांची नावे आहेत. माल्डा जिल्ह्यातील एका ठिकाणी त्यांनी जेएमबीचा अड्डा बनवला होता. तिथे छापा टाकून एसटीएफच्या पथकाने त्यांना पकडले. त्यांच्या पलायनाचा प्रयत्न एसटीएफने अयशस्वी ठरवला.
याआधी मागील आठवड्यात जेएमबीच्या भारतातील म्होरक्यांपैकी एक असणाऱ्या एजाज अहमद याला बिहारच्या गया जिल्ह्यात पकडण्यात आले. त्यामुळे जेएमबीच्या विरोधात सुरक्षा आणि तपास यंत्रणांनी धडक मोहीम हाती घेतल्याचे स्पष्ट होत आहे. भारत आणि बांगलादेशमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचे जेएमबीचे मनसुबे असल्याचे याआधीच उघड झाले आहे.