नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियामधून आठ चित्ते भारतात दाखल झाले होते. त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. यात 5 मादी आणि 3 नरांचा समावेश होता. मात्र यातील 5 वर्षांच्या एका मादी चित्त्याचे सोमवारी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी आरोग्य तपासणीत ‘साशा’ चित्त्याची प्रकृती ढासळत असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी वन कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ‘साशा’ चित्ता किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याचे आढळले.
याशिवाय साशा चित्त्याच्या रक्त तपासणीत क्रिएटिनची पातळी अधिक झाल्याने मूत्रपिंडात संसर्ग झाल्याचेही समोर आले. या मादी चित्त्याच्या निधनानंतर उद्यानातील इतर चित्त्यांची देखील तपासणी करण्यात आली. मात्र इतर चित्ते सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, भारतात चित्त्यांचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. त्यानंतर नामिबियामधून मागील वर्षी 17 सप्टेंबर 2022 महिन्यात 8 चित्ते भारतात आणले होते. त्यावेळी या चित्त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना 10 किलोमीटर पसरलेल्या उद्यानात सोडण्यात आले होते. ओबान, आशा, सिबली, सिसा, फ्रेडी, सवाना आणि साशा अशी या आठ चित्त्यांची नावे आहेत. मात्र यातील साशा या मादी चित्त्याच्या मृत्यूमुळे वनविभागाकडून आता विशेष दक्षता घेतली जात आहे. नुकतेच फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेहून 7 नर आणि 5 मादी असे एकूण 12 चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले आहे.