भाजप आणि पवार (अग्रलेख)

सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप नेत्यांमधील सामना चांगलाच रंगात आला आहे. रविवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेही सोलापुरात एका सभेत उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर चांगलेच तोंडसुख घेतलेले दिसले. अर्थात, त्यांच्या मुद्द्यांमध्ये वस्तुस्थितीपेक्षा राजकीय अविर्भावच अधिक होता, पण त्यांचा सारा “फोकस’ शरद पवार आणि राष्ट्रवादीला खच्ची करण्याचाच होता. “शरद पवारांनी महाराष्ट्रात 15 वर्षे सत्ता उपभोगत असताना महाराष्ट्रासाठी काय केले,’ असा अमित शहांचा सवाल होता.

“केंद्रातही शरद पवार अनेक वर्षे मंत्री होते त्यावेळी त्यांनी काय केले,’ असाही त्यांचा प्रश्‍न होता. आता प्रश्‍न असा आहे की, जर शरद पवार हे इतके निष्क्रिय होते तर याच मोदी सरकारने त्यांचा पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन गौरव कसा केला, हे कोणी तरी अमित शहांना विचारायला हवे. पद्मविभूषण हा भारतातील “भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराच्या खालोखाल महत्त्वाचा पुरस्कार आहे.

भाजपचेच सरकार त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करणार आणि हेच भाजपचे नेते निवडणुकीच्या काळात मात्र शरद पवारांना निष्क्रिय आणि कुचकामी ठरवणार, हे काय गौडबंगाल आहे याची उकल सामान्य जनतेला व्हायला हवी आहे. किंबहुना भाजपच्या नेत्यांनीच हे नीट समजावून सांगितले पाहिजे. “ते आले आणि सभा घेऊन काहीबाही बोलून गेले,’ असे किती दिवस चालणार? आज महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच पाठिंब्यावर सत्तेवर आले आहे, या वस्तुस्थितीकडेही डोळेझाक करून चालणार नाही. थोडी थोडकी नव्हे तर तब्बल सहा महिने हे फडणवीसांचे सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर तगून होते. शिवसेना चक्‍क विरोधात बसली होती.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. हा काही फार जुना इतिहास नाही. जेमतेम साडेचार वर्षांपूर्वीचीच ही बाब आहे. एनसीपी म्हणजे “नॅचरली करप्ट पार्टी’ असे जिचे वर्णन खुद्द मोदींनी बारामतीच्या सभेत केले होते व “चाचा-भतीजांने महाराष्ट्र लुटल्या’चा आरोप ज्या मोदींनी केला होता त्यांना त्यावेळी राष्ट्रवादीचा पाठिंबा कसा चालला, असा प्रश्‍न लोकांनी उपस्थित करायचा नाही काय, हा प्रश्‍नही कोणीतरी अमित शहांना विचारायला हवा. भाजपच्या प्रचार शैलीपुढे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आज फारच मवाळ वाटू लागले आहेत. त्यांनीही भाजपसारखी तडाखेबाज प्रचारशैली अंगीकारली पाहिजे, असा अनाहूत सल्ला त्यांना या पार्श्‍वभूमीवर द्यावासा वाटतो.

मागचा पुढचा राजकीय इतिहास गुंडाळून मनाला येईल तशी बेफाम राजकीय टोलेबाजी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते करीत नाहीत म्हणूनच सध्या भाजपचा एकतर्फी शंखनाद सुरू आहे, असे म्हणावे लागते. वास्तविक शरद पवार हे किती कर्तबगार नेते आहेत हे खुद्द अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवाणी, देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडूनच महाराष्ट्रातल्या जनतेने याआधी विविध कार्यक्रमांमध्ये ऐकले आहे. त्या भाषणाच्या जुन्या व्हिडीओ चित्रफिती अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना ऐकवल्या पाहिजेत. येथे शरद पवार यांची बाजू उचलून धरण्याचा प्रश्‍न नाही. राजकारणात कसा दुटप्पीपणा सुरू आहे हा विषय येथे अधोरेखित करायचा आहे.

एकीकडे तुम्ही निवडणुका नसताना पवारांच्या नेतृत्वशैलीचे तोंड भरून कौतुक करणार, इतके की खुद्द मोदींच म्हणाले होते, “पवार हे माझे राजकारणातले गुरू आहेत आणि त्यांचे बोट धरूनच आम्ही राजकारणात आलो आहोत.’ आणि आता निवडणुका आल्यावर हेच भाजपचे लोक “शरद पवारांइतका निष्क्रिय राजकीय नेता महाराष्ट्राने पाहिलेला नाही,’ असे जर सांगत असतील तर शरद पवार या व्यक्‍तिमत्त्वाविषयी भाजपच द्विधा मनःस्थितीत दिसतो आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्रवादीचेही लोक जरा जागृत झालेले दिसताहेत. त्यांनी या जुन्या चित्रफिती मिळवून त्या सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली आहे. राजकारण म्हटले की चिखलफेक चालणारच. हे जरी मान्य केले तरी त्याला काही ताळतंत्र आहे की नाही, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. ज्या एखाद्या व्यक्‍तीला तुम्ही महानायक ठरवता तीच व्यक्‍ती तुमच्यासाठी निवडणुका आल्या की खलनायक कशी ठरते, याचे इंगित लोकांनाही समजले पाहिजे. हे अमित शहा नावाचे महाशय राजकीय सभांमध्ये काहीही बोलू शकतात. मागच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ते राज्यातील प्रत्येक सभांमध्ये महाराष्ट्रात गेल्या 15 वर्षांत तब्बल 14 लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगत होते.

महाराष्ट्राचे बजेट दीड लाख कोटींचे, त्यात 14 लाख कोटी रुपयांचा घोटाळा कसा, याचा जाब कोणी त्यांना त्यावेळी विचारला नाही. त्यांना जाब विचारण्याचे काम कोणीही करीत नाही; म्हणूनच कदाचित ते आपल्या स्वैर भाषणशैलीत ही राजकीय टोलेबाजी करीत असावेत. शरद पवारांवर वारंवार होणारी ही चिखलफेक आता पवारांच्या कुटुंबीयांनाच सहन होईनाशी झाली असावी म्हणून आज शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनीही, “आता बस्स झाले’ अशा शब्दांत संताप व्यक्‍त करीत भाजपवर आक्रमक भाषेत टीका केली आहे. राजकीय मतभेद कितीही टोकाचे असोत; पण पवारांच्या महाराष्ट्रातील, देशातील विकासाच्या योगदानाबद्दल लोकांच्या मनात आदराचीच भावना आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नेते आज पवारांना सोडून जात आहेत. या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आज गलितगात्र झाल्यासारखी वाटत आहे, हेही खरे आहे; पण तरीही अमित शहा यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने महाराष्ट्रात येऊन पवारांविषयी अशी बेफाम विधाने करणे जरा खटकणारेच आहे. अजून प्रत्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी सुरू व्हायची आहे. त्याच्या आतच अशी वास्तवाला सोडून चिखलफेक सुरू राहणार असेल, तर प्रत्यक्ष प्रचाराचा पोत सभ्य राखणे कोणाच्याच हातात राहणार नाही. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्याने राजकीय प्रचाराची पातळी कायमच वरची राखली आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून संयमी व वस्तुनिष्ठ प्रचाराची गरज आहे. त्याविषयी त्यांनी वेळीच सावध होण्यात महाराष्ट्राचेही हीत सामावलेले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×