श्रीनगर/ नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाच्या जम्मूतील तळावर दहशतवाद्यांनी शनिवारी मध्यरात्री नंतर ड्रोनद्वारे बॉम्ब टाकल्यानंतर रविवारी मध्यरात्री पुन्हा एकदा दोन ड्रोन रत्नुचक-कालुचक लष्करी तळावर घिरट्या घालताना आढळले.
27 आणि 28 जूनच्या मध्यरात्री या तळावर ड्रोनच्या हालचाली दिसल्यानंतर लष्कराच्या पथकाला सतर्क करण्यात आले. अतिसतर्कतेचा भोंगा वाजवण्यात आल्या त्यानंतर शीघ्र प्रतिसाद दलाने त्यावर गोळीबार केला, अशी माहिती संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्ट. कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली.
जम्मूत पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले, सतर्कता आणि लष्कराच्या आक्रमक भूमिकेमुळे मोठा धोका टळला आहे. सुरक्षा दले सतर्क ठेवण्यात आली असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
जम्मूतील हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला घडवला. अशा स्वरूपाचा देशातील हा पहिलाच हल्ला आहे. पाच मिनिटांच्या अंतराने झालेल्या या दोन स्फोटात हवाई दलाचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले.
इमारतीच्या छताला त्यामुळे काहीशी हानी पोहोचली. त्याशेजारी असणाऱ्या विमाने ठेवण्याच्या जागेपासून हे अंतर जवळच होते. त्यात कोणत्याही मौल्यवान सामग्रीचे नुकसान झाले नाही.
लष्करी गुप्तचर खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या दोघांनीही स्फोट नेमका कसा झाला आणि स्फोटापूर्वी ड्रोनचा आवाज ऐकला होता का ? याबाबत नेमकेपणाने माहिती दिली नाही. भारतीय हद्दीतून हे ड्रोन उडवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.