नैरोबी – तुर्कीच्या सोमालिया येथील लष्करी तळावर आज आत्मघाती हल्ला करण्यात आला. त्यात दोन जण ठार झाले तर अन्य अनेक जण जखमी झाले आहेत. मोंगदिशु येथील तुर्कस्तानच्या लष्करी तळावर झालेला अशा प्रकारचा हा पहिला हल्ला आहे. तेथे आत्मघाती पथकातील दहशतवादी स्वता भोवती स्फोटके गुंडाळून घुसला आणि त्याने स्वताला उडवून दिले असे पहिल्या वृत्तात म्हटले आहे.
अलकायदाशी संबंधित अल शबाब या दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली आहे. या तळावर आज लष्करात नव्याने भरती झालेले काही छात्र सकाळचे संचलन करीत असताना हा हल्ला झाला. तथापि हल्लेखोर या तळावर आतपर्यंत कसा घुसू शकला हे समजू शकलेले नाही. तो आत शिरल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या सुरक्षा जवानांनी त्याला हटकले पण तो न थांबता आत घुसू लागल्याने त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात त्याच्या भोवती लपटलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला असेही काही जणांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. सोमालिया सरकारच्या लष्कराला मदत व प्रशिक्षण देण्यासाठी तुर्कीचे लष्कर गेल्या अनेक दिवसांपासून सोमालियात कार्यरत आहे.