नागरिक धास्तावले : मृत महिलेच्या कुटुंबातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह
तळेगाव ढमढेरे (प्रतिनिधी) : येथील काल ६० वर्षीय महीलेचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे त्याचबरोबर मृत महिलेच्या कुटुंबातील दोन सदस्यांचा चाचणी अहवाल कोरोना बाधित आला असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ.प्रज्ञा घोरपडे आणि करोना कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भराटे यांनी दिली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.
शिरूर तालुक्यात आत्तापर्यंत तब्बल ७ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान तळेगाव ढमढेरेमध्ये कोरोनाचा आणखी प्रसार होत असल्यामुळे गावामध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी क्वारंटईन केलेल्या नागरिकांना धीर देत आहेत त्याचबरोबर गावातील नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.
याअगोदर गावातील महिलेचा मृत्य आणि आता आणखी दोन कोरोना बाधित आढळून आल्याने नागरिकांनी घरातच बसने पसंद केले आहे तळेगाव ढमढेरेमध्ये कडकडीत लॉकडाऊनचे पालन केले जात आहे.
तळेगाव ढमढेरे मधील करोनाबाधित रुग्ण पुण्यातील औंध सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. क्वारंटाईन केलेल्या २० जणांपैकी १० जण आरोग्य विभागाच्या अति दक्षतेच्या निगराणीत आहे. तर सर्वसाधारण १० जण होम क्वारंटाईनचे पालन करून घरी थांबले आहेत.