तळेगाव ढमढेरे, (वार्ताहर)- अयोध्यामध्ये श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्र विराजमान झाल्यानिमित्त तळेगाव ढमढेरे येथे माजी उपसरपंच गणेश तोडकर यांच्या वतीने भव्य रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी श्रीरामकृष्ण परमहंस सेवा संस्थेचे प्रमुख ह. भ. प. समाधान महाराज शर्मा यांचे तळेगाव ढमढेरे नगरीत जंगी स्वागत करण्यात आले. तळेगाव ढमढेरे बाजार मैदान ते बाजार पेठेमार्गे कार्यक्रम स्थळापर्यंत ढोल -ताशा तसेच पारंपारिक वाद्याच्या गजरात रथामधून शर्मा महाराज यांची मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमासाठी तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, सणसवाडी, विठ्ठलवाडी, धानोरे, टाकळी भीमा ते दहिवडीपर्यंतच्या गावातील भाविकांनी गर्दी केली होती. पहिल्या दिवशी ग्रंथ महात्म, दुसऱ्या दिवशी शिवापार्वती विवाह तर आज श्रीराम जन्मोत्सव यावर श्रीरामकृष्ण परमहंस सेवा संस्थेचे प्रमुख ह. भ. प. समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून कथेचा अविष्कार संपन्न झाला.
यापुढे 20 तारखेपार्यंत होणाऱ्या राम कथा कार्यक्रमात सीताराम स्वयंवर, राम वनवास आणि केवट भेट, भरत व राम भेट, शबरी राम मिलन हनुमान भेट, युद्ध प्रसंग, रावण दहन आणि श्रीराम राज्यभिषेक हे कथेचे विषय आहेत.
कथेदरम्यान महादेव, पार्वती, प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या वेशभूषा धारण केलेल्या व्यक्ती आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रम झाल्यानंतर तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक माजी उपसरपंच गणेश तोडकर यांनी सांगितले.